Hearing Outside Court in Patna : बिहारची राजधानी पाटणा येथे न्यायव्यवस्थेच्या संवेदनशीलतेचे एक अनोखे आणि हृदयस्पर्शी उदाहरण समोर आले आहे. एका 90 वर्षीय वृद्ध आरोपीची शारीरिक अवस्था पाहून चक्क सीबीआय (CBI) न्यायाधीशांनी कोर्टाची पायरी ओलांडून बाहेर येत कारजवळच सुनावणी घेतली. न्यायाधीशांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सोमवारी सकाळी 11 वाजता पाटणा येथील सीबीआय न्यायालयाबाहेर एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. जमुई येथील 90 वर्षीय जय नारायण सिंह हे एका फसवणुकीच्या प्रकरणात सुनावणीसाठी आले होते. मात्र, वाढत्या वयामुळे आणि आजारपणामुळे त्यांना कारमधून उतरून कोर्ट रूमपर्यंत जाणे अशक्य होते. त्यांच्या वकिलांनी ही अडचण विशेष न्यायाधीश अविनाश कुमार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर न्यायाधीशांनी कोणताही अहंकार न ठेवता स्वतः कोर्टाबाहेर येण्याचा निर्णय घेतला. न्यायाधीश अविनाश कुमार हे सकाळी 11 ते 11:35 वाजेपर्यंत कारजवळ उभे होते आणि त्यांनी तिथेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.
नेमकं प्रकरण काय होतं?
हा कायदेशीर वाद 2011 मध्ये सुरू झाला होता. जय नारायण सिंह यांच्यावर यूको बँकेने (UCO Bank) फसवणुकीचा आरोप केला होता. त्यांनी ट्रॅक्टर खरेदीसाठी बनावट कागदपत्रे सादर करून सुमारे 4 ते 5 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. सीबीआयने या प्रकरणाचा तपास केला असता, कर्जासाठी दिलेली कागदपत्रे खोटी असल्याचे निष्पन्न झाले होते. गेल्या 15 वर्षांपासून हा खटला न्यायालयात प्रलंबित होता आणि वृद्ध आरोपी सातत्याने कोर्टाच्या चकरा मारत होता.
गुन्ह्याची कबुली आणि माणुसकीचा निकाल
कारपाशी सुरू असलेल्या 35 मिनिटांच्या सुनावणीदरम्यान, न्यायाधीश अविनाश कुमार यांनी कायदेशीर बाजू ऐकून घेतल्या. शिवाय, जय नारायण सिंह यांची आपुलकीने चौकशीही केली. यावेळी वृद्ध आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. आरोपीचे वय आणि त्यांची ढासळलेली प्रकृती लक्षात घेऊन न्यायाधीशांनी मोठा निर्णय दिला. बँकेकडून घेतलेली कर्जाची रक्कम परत करण्याच्या अटीवर हा खटला कायमचा बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. यामुळे एका दशकाहून अधिक काळ चाललेला हा कायदेशीर लढा अखेर माणुसकीच्या नात्याने संपला.
न्यायव्यवस्थेचा नवा चेहरा
सामान्यतः न्यायालयात आरोपींना पिंजऱ्यात उभे राहावे लागते, पण पाटणा येथील या घटनेने न्यायव्यवस्था किती संवेदनशील असू शकते, हे सिद्ध केले आहे. न्यायाधीशांनी दाखवलेली ही तत्परता आणि माणुसकी पाहून कोर्ट परिसरात उपस्थित असलेले वकील आणि नागरिक भारावून गेले. "न्याय हा केवळ नियमांवर चालत नाही, तर तो परिस्थिती आणि मानवी मूल्यांचाही विचार करतो," असा संदेश या घटनेतून समाजात गेला आहे.