Burj Khalifa Evacuated: मध्यपूर्वेतील तणावाने आता युद्धाचे भीषण रूप धारण केले असून शनिवारी दुबईमध्ये मोठे स्फोट झाले आहेत. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात इराणने विविध देशांमधील अमेरिकन तळांना लक्ष्य केले आहे. दुबईतील स्फोटांनंतर सुरक्षेच्या कारणास्तव जगातील सर्वात उंच इमारत ‘बुर्ज खलिफा’ तातडीने रिकामी करण्यात आली. केवळ दुबईच नव्हे, तर सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्येही स्फोटांच्या नोंदी झाल्या आहेत. अबू धाबीतील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांजवळ भीषण आवाज ऐकू आले असून, या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.
UAE संरक्षण मंत्रालयाचा दावा: क्षेपणास्त्र हल्ला उधळला
संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) संरक्षण मंत्रालयाने अधिकृतपणे या हल्ल्याची पुष्टी केली आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इराणकडून डागलेली बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे UAE च्या प्रगत हवाई संरक्षण यंत्रणेने (Air Defense System) यशस्वीरित्या हवेतच रोखली आणि नष्ट केली. मात्र, या क्षेपणास्त्रांचे अवशेष निवासी भागात कोसळल्याने मालमत्तेचे नुकसान झाले असून, एका आशियाई नागरिकाचा मृत्यू झाला आहे. सध्या UAE मधील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर असून सर्व संबंधित एजन्सी 24 तास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
डोनाल्ड ट्रम्प आणि नेतान्याहू यांचा एल्गार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कारवाईचे समर्थन करताना म्हटले की, इराणचा अणुकार्यक्रम आणि त्यांची वाढती क्षेपणास्त्र शक्ती जगासाठी धोकादायक आहे. ट्रम्प यांनी इराणी जनतेला अयातुल्ला अली खमेनी यांच्या राजवटीविरुद्ध बंड करण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इराणी राजवट उलथवून टाकण्याची शपथ घेतली आहे. “आमच्या संयुक्त कारवाईमुळे इराणी लोकांना त्यांचे भविष्य स्वतःच्या हातात घेण्याची संधी मिळेल,” असे नेतान्याहू यांनी स्पष्ट केले आहे. शनिवारी झालेल्या हल्ल्यात खमेनी यांच्या कार्यालयालाही लक्ष्य करण्यात आले होते.
Ministry of Defence of the United Arab Emirates tweets, "The UAE today was subjected to a blatant attack involving Iranian ballistic missiles, noting that UAE air defence systems dealt with the missiles with high efficiency and successfully intercepted a number of missiles.… pic.twitter.com/CTEzFuBZnO — ANI (@ANI) February 28, 2026
इराणचा निर्णायक प्रतिहल्ला करण्याचा इशारा
अमेरिका आणि इस्रायलच्या या आक्रमक पवित्र्यानंतर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने अत्यंत कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. “आता मातृभूमीचे रक्षण करण्याची आणि शत्रूच्या लष्करी आक्रमणाचा सामना करण्याची वेळ आली आहे,” असे इराणने म्हटले आहे. आपल्या निवेदनात त्यांनी स्पष्ट केले की, इराण कधीही परकीय आक्रमणापुढे झुकलेला नाही आणि यावेळीही त्यांचा प्रतिसाद अत्यंत निर्णायक आणि स्पष्ट असेल. या युद्धाच्या भडक्यामुळे संपूर्ण मध्यपूर्वेत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून जागतिक शांतता धोक्यात आली आहे.