Pakistan Petrol Subsidy Scheme: पश्चिम आशियातील युद्ध आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे भारताच्या शेजारील देशांमध्ये मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. पाकिस्तानात इंधनाचा तुटवडा असाच कायम राहिल्यास पेट्रोलचे दर प्रति लिटर 1,000 पाकिस्तानी रुपयांपर्यंत (भारतीय चलनात सुमारे 346 रुपये) पोहोचू शकतात, असा गंभीर इशारा पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री अली परवेझ मलिक यांनी दिला आहे. 28 फेब्रुवारी रोजी पश्चिम आशियात तणाव सुरू झाल्यापासून पाकिस्तानात पेट्रोलच्या दरात 131 रुपयांची म्हणजेच तब्बल 51 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. सध्या तेथे पेट्रोल 389 पाकिस्तानी रुपये आणि डिझेल 424 रुपये प्रति लिटर या ऐतिहासिक उच्चांकी दराने विकले जात आहे.
नागरिकांना दिलासा देण्यासाठी पाकिस्तानात विशेष सबसिडी योजना
वाढत्या महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी पाकिस्तान सरकारने दुचाकी, रिक्षा आणि 800 सीसी पर्यंतच्या गाड्यांसाठी पेट्रोल सबसिडी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत खालीलनुसार सवलती दिल्या जात आहेत:
– सबसिडी व सूट: पात्र नागरिकांना प्रति लिटर 100 रुपयांपर्यंत सबसिडी दिली जात असून, दरमहा 500 रुपयांची सूट देणारे 4 टोकन्स मिळतात.
– लाभार्थी संख्या: आतापर्यंत सुमारे 17.5 लाखांहून अधिक नागरिकांनी या सबसिडी योजनेसाठी नोंदणी केली आहे.
– देशांतर्गत उत्खनन: परकीय चलनाची बचत करण्यासाठी तेल व वायू उत्खननाचे नवीन ब्लॉक्स कंपन्यांना देण्यात आले असून, ऑक्टोबर महिन्यापर्यंत व्यावसायिक पातळीवर कच्चे तेल उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बांगलादेशातही इंधन दरांमध्ये 17.4 टक्क्यांपर्यंत मोठी वाढ
दुसरीकडे, बांगलादेश सरकारनेही सरकारी तेल कंपनी 'बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशन'चा आर्थिक तोटा कमी करण्यासाठी इंधनाच्या दरात 17.4 टक्क्यांपर्यंत थेट वाढ लागू केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव दुप्पट झाल्यामुळे हे पाऊल उचलावे लागल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. बांगलादेशातील नवीन दर असे आहेत –
डिझेल: 115 वरून थेट 135 टका प्रति लिटर
पेट्रोल: 140 वरून थेट 160 टका प्रति लिटर
ऑक्टेन : ऑक्टेनचे दर 145 वरून 165 टका प्रति लिटर
रॉकेल : रॉकेलचे दर 135 वरून 155 टका प्रति लिटर
महागाईचा भडका आणि सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण
इंधनाचे दर अचानक आणि मोठ्या प्रमाणावर वाढल्याने पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये वाहतूक आणि उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तू महागल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्धजन्य परिस्थिती निवळली नाही, तर आगामी काळात इंधनाचे हे संकट आणखी गहिरे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.