Pakistani Leader Chaudhry Anwarul Haq Statement : पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी घातले जाते, हा भारताचा आरोप खरा ठरवणारी एक मोठी कबुली पाकिस्तानातून समोर आली आहे. पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तानचे मोठे नेते चौधरी अन्वर उल हक यांनीच जाहीरपणे याची कबुली दिली आहे. पाकिस्तानकडून सीमेपलीकडून दहशतवादाला खतपाणी घातले जाते, हे सत्य आंतरराष्ट्रीय मंचांवर भारताने अनेकदा पुराव्यांसह उघड केले आहे. मात्र, तिथे पाकिस्तान कोणता ना कोणता रडीचा डाव खेळून स्वतःची लक्तरं वाचवण्याचा प्रयत्न करत आला आहे. मात्र, आता खुद्द त्यांच्याच नेत्याने हे मान्य केले आहे.. तेही त्यांच्या संसदेत..!
संसदेत काय म्हणाले चौधरी अन्वर उल हक?
चौधरी अन्वर उल हक यांनी पाकिस्तानच्या संसदेत बोलताना एक अत्यंत असंवेदनशील, आक्षेपार्ह आणि धक्कादायक विधान केले. ते म्हणाले, “मी आधीच म्हणालो होतो. तुम्ही जर बलुचिस्तानमध्ये रक्तपात करत राहिलात, तर आम्ही लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलात शिरून भारतावर हल्ले करू. अल्लाहच्या कृपेने, आम्ही काही दिवसांतच आतमध्ये घुसून असे हल्ले केले की, आजपर्यंत मृतदेहांची गणती सुरू आहे.” त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
? Explosive admission: Former PoK PM Chaudhry Anwarul Haq openly takes credit in Parliament for Pakistan-backed terror striking India — saying, “we’ve hit India from the *Red Fort to Kashmir in retaliation to alleged role in Balochistan..… they still can’t count bodies.” pic.twitter.com/81iMZxarkt — Megh Updates ?™ (@MeghUpdates) November 19, 2025
दिल्लीतील हल्ल्याचा उल्लेख
चौधरी अन्वर उल हक या पाकिस्तानी नेत्याने केलेल्या या टिप्पणीत लाल किल्ला आणि काश्मीरच्या जंगलाचा उल्लेख केला आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ एका चालत्या गाडीत मोठा स्फोट झाला होता, ज्यात 14 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच, त्यांनी उल्लेखलेला काश्मीरच्या जंगलाचा संदर्भ 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याकडे असू शकतो, ज्यात 26 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे भारत सरकार यावरती काय नीती अवलंबणार, हे नजिकच्या भविष्यकाळात स्पष्ट होईल.
भारताचे प्रत्युत्तर आणि अंतर्गत समस्या
पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या रसातळाला पोहोचली आहे. त्यामुळे तेथील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानचे नेते बलुचिस्तानमधील अशांततेसाठी वारंवार भारताला दोष देत आहेत, पण भारताने हे दावे नेहमीच फेटाळून लावले आहेत. पहलगामच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने सिंधू जल कराराला स्थगिती दिली होती. तसेच, ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमध्ये शिरून दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले होते.