Oracle Layoffs: कॉर्पोरेट जगतात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर उत्पादकता वाढवण्यासाठी केला जात असला, तरी यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. अमेरिकेतील आघाडीची टेक कंपनी 'ओरॅकल' (Oracle) मध्ये याचे थेट परिणाम पाहायला मिळाले आहेत. कंपनीने आर्थिक वर्ष 2026 मध्ये आपल्या जागतिक मनुष्यबळात मोठी कपात करत तब्बल 21,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. एआय-आधारित सिस्टीमचा वापर वाढल्यामुळे आगामी काळातही नोकरकपातीची ही टांगती तलवार कायम राहू शकते, अशी भीती ओरॅकलने व्यक्त केली आहे.
मनुष्यबळात 13 टक्के घट; ऑटोमेशन ठरले मुख्य कारण
ओरॅकलने जारी केलेल्या ताज्या वार्षिक अहवालानुसार, 31 मे 2026 पर्यंत कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या घसरून 1,41,000 वर आली आहे; जी गेल्या वर्षी 1,62,000 च्या घरात होती. याचा अर्थ कंपनीने आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 13 टक्के कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. कंपनीमधील अनेक अंतर्गत कामे आणि प्रक्रिया आता एआय तंत्रज्ञानाद्वारे स्वयंचलित (ऑटोमेटेड) केल्या जात असल्याने मानवी कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासत नसल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे. याशिवाय अंतर्गत पुनर्रचना, व्यवस्थापकीय बदल आणि कामगिरीचे निकष यांमुळेही ही टाळेबंदी करण्यात आली आहे.
एआय आणि क्लाउड क्षेत्रात वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न
ओरॅकल आता आपली ओळख केवळ 'डेटाबेस सॉफ्टवेअर कंपनी' पुरती मर्यादित न ठेवता एआय आणि क्लाउड कम्प्युटिंग क्षेत्रात झपाट्याने पाय पसरत आहे. कंपनीचे चेअरमन लॅरी एलिसन यांच्या मार्गदर्शनाखाली ओरॅकलने थेट ॲमेझॉन आणि मायक्रोसॉफ्टसारख्या बलाढ्य कंपन्यांना टक्कर देण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी 'OpenAI' सारख्या बड्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करू शकतील अशा अवाढव्य एआय डेटा सेंटर्सच्या उभारणीवर कंपनीचा भर आहे.
एआय विस्तारासाठी 70 अब्ज डॉलर्सचा भव्य आराखडा
चालू आर्थिक वर्षात ओरॅकलने एआयच्या विस्तारासाठी सुमारे 70 अब्ज डॉलर्सच्या भांडवली गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा अवाढव्य खर्च पेलण्यासाठी कंपनी कर्ज आणि इक्विटीच्या माध्यमातून अतिरिक्त 40 अब्ज डॉलर्स उभे करण्याच्या तयारीत आहे. एआयच्या शर्यतीत आघाडीवर राहण्यासाठी ओरॅकलला मोठा आर्थिक भारही सोसावा लागत आहे. कर्मचाऱ्यांची कपात आणि पुनर्रचनेच्या प्रक्रियेवर कंपनीने आर्थिक वर्ष 2026 मध्ये तब्बल 1.84 अब्ज डॉलर्स खर्च केले, जो गेल्या वर्षी केवळ 374 दशलक्ष डॉलर्स इतका होता.
भविष्यातही नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता
एआय आणि ऑटोमेशनच्या सततच्या विकासामुळे येणाऱ्या काळात कर्मचाऱ्यांची संख्या आणखी कमी होऊ शकते, असा स्पष्ट इशारा ओरॅकलने आपल्या अहवालात दिला आहे. पूर्वी ज्या कामांसाठी मानवी बुद्धिमत्ता आणि श्रमाची गरज भासायची, ती कामे आता एआय अल्गोरिदम अधिक वेगाने करू शकत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. सध्या जागतिक स्तरावर तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये एआयचा स्वीकार मोठ्या प्रमाणावर केला जात असून, यामुळे भविष्यातील रोजगार निर्मिती आणि नोकऱ्यांच्या स्वरूपात मोठे बदल पाहायला मिळतील.