IAF Garud Commandos: अमेरिका-इराण संघर्ष आणि मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने देशाची सुरक्षा व्यवस्था अधिक चोख करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. भारतीय हवाई दलाच्या (IAF) 'गरुड स्पेशल फोर्सेस'साठी आता अत्याधुनिक 'मायक्रो-UAV' (Micro-Unmanned Aerial Vehicles) खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हे ड्रोन दुर्गम पर्वतीय रांगा आणि बर्फाळ प्रदेशात शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर ठेवण्यास सक्षम असतील.
उणे 20 अंश तापमानातही करणार कामगिरी
प्रस्तावित सूक्ष्म-UAV प्रणाली समुद्रसपाटीपासून तब्बल 16,400 फुटांच्या उंचीवर कार्यरत राहू शकते. विशेष म्हणजे, उणे 20 डिग्री सेल्सिअस पासून ते कडक उन्हाच्या 50 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत हे ड्रोन प्रभावीपणे काम करतील. यामुळे हिमालयातील बर्फाळ शिखरांपासून ते राजस्थानच्या रखरखीत वाळवंटापर्यंत कोणत्याही वातावरणात गरुड कमांडोज प्रभावीपणे पाळत ठेवू शकतील.
संरक्षण मंत्रालयाकडून प्रक्रियेला सुरुवात
संरक्षण मंत्रालयाने या खरेदीसाठी 'Request for Information' (RFI) जारी केली आहे. हे UAV वजनाने इतके हलके असतील की केवळ 2 व्यक्तींची टीम ते सहजपणे वाहून नेऊ शकेल. यामध्ये 'ऑटोनॉमस व्हर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग' (AVTOL) सुविधा, सुरक्षित 'एनक्रिप्टेड' संवाद यंत्रणा आणि 24 तास रिअल-टाइम माहिती देण्याची क्षमता असेल. हे ड्रोन केवळ पाळत ठेवणार नाहीत, तर लक्ष्याचा अचूक शोध (Target Acquisition) घेण्यासही मदत करतील.
विना-GPS आणि स्वदेशी नेव्हिगेशनने सज्ज
या ड्रोनची रेंज किमान 15 किलोमीटर असून ते सलग 60 मिनिटे हवेत राहू शकतात. ज्या ठिकाणी GPS सेवा उपलब्ध नसेल (GPS-denied environments), अशा ठिकाणीही हे ड्रोन काम करतील. विशेष म्हणजे, हे 'भारतीय प्रादेशिक नेव्हिगेशन उपग्रह प्रणाली' (IRNSS) शी जोडलेले असतील. यात इन्फ्रारेड पेलोड्स आणि रिमोट व्हिडिओ टर्मिनल्ससारखी प्रगत उपकरणे समाविष्ट असल्याने हे एक परिपूर्ण 'ऑपरेशनल पॅकेज' ठरणार आहे.
'आत्मनिर्भर भारत' अभियानाला गती
या प्रकल्पांतर्गत स्वदेशी उत्पादनाला प्राधान्य देण्यात आले आहे. या ड्रोनच्या निर्मितीमध्ये किमान 60 टक्के स्वदेशी घटकांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. यामुळे भारतीय स्टार्टअप्स आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSMEs) मोठी संधी मिळणार असून, संरक्षणाबाबत परकीय देशांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे.