Wireless Electricity: ज्याप्रमाणे आपण वाय-फाय (WiFi) वापरतो किंवा मोबाईलवर बोलतो, अगदी त्याचप्रमाणे आता घराघरांत वीज पोहोचणार आहे. विजेच्या लोंबकळणाऱ्या तारा, प्लग आणि सॉकेटचे झंझट लवकरच संपण्याची चिन्हे आहेत. फिनलँडमधील संशोधकांनी 'वायरलेस पावर ट्रान्सफर' (Wireless Power Transfer) तंत्रज्ञानात मोठे यश मिळवले असून, हवेतून वीज पाठवण्याचे प्रयोग यशस्वी झाले आहेत.
कसे काम करणार हे तंत्रज्ञान?
सध्या आपण मोबाईल चार्ज करण्यासाठी केबलचा वापर करतो, मात्र वायरलेस वीज तंत्रज्ञानात ध्वनीतरंग (Sound Waves), लेझर, रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि मॅग्नेटिक फील्ड्सचा वापर केला जातो. आतापर्यंत वायरलेस चार्जिंगसाठी उपकरण ठराविक जागी स्थिर ठेवावे लागत होते. मात्र, आल्टो आणि हेलसिंकी विद्यापीठातील संशोधनामुळे आता उपकरण हलत असतानाही (In Motion) चार्ज होऊ शकणार आहे. प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये या तंत्रज्ञानाने 80 टक्क्यांहून अधिक कार्यक्षमता दाखवून दिली आहे.
संशोधनाचा सुवर्णकाळ
या तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे 'टाईम मॅगझीन'ने 2025 मध्ये फिनलँडच्या या शोधाला जगातील सर्वोत्तम उपक्रमांमध्ये स्थान दिले आहे. सध्या लॅबच्या बाहेर छोटे रोबॉट्स, सेन्सर्स आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स हवेतून मिळणाऱ्या ऊर्जेवर यशस्वीरीत्या चालवून दाखवण्यात आले आहेत.
घराघरांत कधी येणार वायरलेस वीज?
दरम्यान, हे तंत्रज्ञान ऐकायला विलोभनीय वाटत असले तरी, ते प्रत्यक्ष घराघरांत पोहोचण्यासाठी अद्याप काही आव्हाने आहेत. सध्या हे तंत्रज्ञान कमी अंतरासाठी आणि कमी दाबाच्या विजेसाठी अधिक प्रभावी आहे. सध्या हवेतून वीज प्रवाहित होताना मानवी आरोग्यावर आणि पर्यावरणावर त्याचे काय परिणाम होतात, याचा सखोल अभ्यास सुरू आहे. फ्रीज, एसी यांसारख्या मोठ्या उपकरणांसाठी वायरलेस वीज वापरण्याबाबत अधिक संशोधनाची गरज आहे.