Nora Fatehi’s Reaction on Sarke Chunar Teri Song Controversy : ‘केडी – द डेविल’ चित्रपटातील ‘सरके चुनर तेरी सरके’ या गाण्यावरून सुरू असलेल्या वादावर अखेर अभिनेत्री नोरा फतेहीने तिचे मौन सोडले आहे. या गाण्यातील आक्षेपार्ह हिंदी शब्दांशी आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगत तिने निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत नोराने स्पष्ट केले की, हे गाणे तिने 3 वर्षांपूर्वी कन्नड भाषेत शूट केले होते आणि हिंदी डबिंग किंवा त्यातील अश्लील शब्दांबाबत तिला कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती.
3 वर्षांपूर्वीचे चित्रीकरण आणि संमतीचा अभाव
नोराने या व्हिडिओत म्हटले आहे की, तिने हे गाणे केवळ संजय दत्त सारख्या दिग्गज अभिनेत्यासोबत काम करण्याच्या संधीसाठी स्वीकारले होते. “मी हे गाणे 3 वर्षांपूर्वी कन्नड भाषेत शूट केले होते. त्यावेळी निर्मात्यांनी मला जे भाषांतर सांगितले होते, त्यामध्ये काहीही आक्षेपार्ह किंवा अश्लील नव्हते. मात्र, आता निर्मात्यांनी माझी कोणतीही परवानगी न घेता किंवा मला न कळवता या गाण्याचे हिंदी डबिंग केले आणि त्यात अत्यंत खालच्या स्तराचे शब्द वापरले आहेत,” असा खळबळजनक खुलासा नोराने केला आहे.
प्रतिमेला धक्का लागल्याची खंत
या वादामुळे आपली प्रतिमा आणि प्रतिष्ठा पणाला लागल्याची भीती नोराने व्यक्त केली आहे. “आम्ही फिल्म इंडस्ट्रीमधील ‘नेपो किड्स’ नाही आहोत, आम्ही स्वबळावर इथपर्यंत पोहोचलो आहोत. जेव्हा आमच्या संमतीशिवाय असे क्रिएटिव्ह निर्णय घेतले जातात, तेव्हा त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागतात,” असे ती म्हणाली. गाण्यातील ‘व्हल्गर’ शब्दरचनेमुळे उद्भवलेल्या वादामुळे निर्मात्यांनी अखेर हे गाणे यूट्यूबवरून हटवले आहे, ज्याबद्दल नोराने समाधान व्यक्त केले आहे.
हेही वाचा – Check Bounce Case: राजपाल यादवला दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; चेक बाऊन्स प्रकरणात तुरुंगवास टळला
निर्मात्यांच्या निर्णयावर नाराजी
नोराच्या मते, काही प्रादेशिक चित्रपटसृष्टीमध्ये कलाकारांच्या मताचा विचार केला जात नाही. तिने वारंवार दिग्दर्शकाकडे या गाण्यातील शब्दांबाबत चिंता व्यक्त केली होती, परंतु तिला प्रतिसाद मिळाला नाही. जेव्हा ‘नॅशनल ह्युमन राइट्स कमिशन’ (NHRC) आणि ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ (CBFC) कडे तक्रारी गेल्या, तेव्हाच निर्मात्यांनी यावर कारवाई केली. या संपूर्ण प्रकरणामुळे नोराने आता यापुढे दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करताना अधिक खबरदारी घेण्याचे संकेत दिले आहेत.
प्रेक्षकांचा पाठिंबा आणि पुढील वाटचाल
नोराने आपल्या चाहत्यांचे आभार मानले असून, त्यांनी दाखवलेल्या पाठिंब्यामुळेच निर्मात्यांना हे आक्षेपार्ह गाणे मागे घ्यावे लागले असे ती मानते. 30 एप्रिल 2026 रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातून आता हे गाणे पूर्णपणे वगळले जाणार की त्यात बदल केले जाणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, नोराच्या या स्पष्टीकरणामुळे आता वादाची सुई थेट निर्मात्यांकडे वळली असून, बॉलिवूडमधील अंतर्गत राजकारणावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.