Air Canada Plane Accident: अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील ला गार्डिया विमानतळावर रविवारी सायंकाळी एअर कॅनडा एक्सप्रेसच्या विमानाने एका ट्रकला धडक दिल्याने मोठी दुर्घटना घडली. या भीषण धडकेत अनेक जण जखमी झाले असून विमानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
विमानाची अग्निशमन दलाच्या ट्रकला धडक
मिळालेल्या माहितीनुसार, एअर कॅनडा एक्सप्रेसचे हे विमान धावपट्टीच्या आवारात उभ्या असलेल्या अग्निशमन दलाच्या ट्रकला धडकले. ही धडक इतकी जोरदार होती की विमानाचा पुढचा भाग (नाक) पूर्णपणे क्षतिग्रस्त झाला आहे. ‘Flightradar24’ या वेबसाइटनुसार, विमानाचा वेग ताशी सुमारे 39 किलोमीटर होता. या घटनेत विमानातील आणि जमिनीवरील अनेक व्यक्ती जखमी झाल्या असून त्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
विमानतळ ठप्प; ‘ग्राउंड स्टॉप’ जाहीर
अपघातानंतर फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने (FAA) तत्काळ दखल घेत विमानतळावर ‘ग्राउंड स्टॉप’ लागू केला आहे. यामुळे ला गार्डिया विमानतळावरून होणारी सर्व उड्डाणे थांबवण्यात आली आहेत, तर बाहेरून येणारी विमाने इतर विमानतळांकडे वळवण्यात आली आहेत. वैमानिकांसाठी जारी केलेल्या सूचनेनुसार (NOTAM), विमानतळ काही काळासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे.
मॉन्ट्रियलहून न्यूयॉर्कला येत होते विमान
अपघातग्रस्त विमान CRJ-900 प्रकारचे असून त्याचे संचालन ‘Jazz Aviation’ या कंपनीमार्फत केले जात होते. हे विमान कॅनडातील मॉन्ट्रियल येथून न्यूयॉर्कला आले होते. लँडिंगनंतर टॅक्सीवेवरून जात असताना ही दुर्घटना घडली. सोशल मीडियावर या अपघाताचे व्हिडिओ आणि फोटो वेगाने व्हायरल होत असून त्यात विमानाचे झालेले नुकसान स्पष्टपणे दिसत आहे.
? BREAKING UPDATE: MULTIPLE CRITICAL PATIENTS AFTER AIR CANADA FLIGHT COLLIDES WITH VEHICLE WHILE LANDING AT LAGUARDIA AIRPORT. POSSIBLE FATALITIES. https://t.co/hZWimAuwe5 pic.twitter.com/62SUgxoUkA — Breaking911 (@Breaking911) March 23, 2026
वैमानिकांसाठी मोठे आव्हान
ला गार्डिया विमानतळ हे जगातील आव्हानात्मक विमानतळांपैकी एक मानले जाते. या विमानतळाच्या धावपट्ट्या आखूड असून सभोवताली पाणी असल्याने येथे विमान हाताळताना वैमानिकांना कसरत करावी लागते. यापूर्वी 2015 मध्ये डेल्टा एअर लाइन्सच्या दोन विमानांची टक्कर आणि 2016 मध्ये माईक पेन्स यांच्या विमानाचा अपघात अशा घटना येथे घडल्या आहेत.