ITR Filing 2026 : आयकर विवरणपत्र (ITR) दाखल करण्याच्या पहिल्या टप्प्याची मुदत नुकतीच संपली असून करदात्यांनी यात उदंड प्रतिसाद दिला आहे. खात्यांचे लेखापरीक्षण (ऑडिट) करण्याची गरज नसलेल्या करदात्यांसाठी ITR-1 आणि ITR-2 फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै ही होती. या मुदतीपर्यंत देशभरातून एकूण 5.9 कोटींहून अधिक आयकर विवरणपत्रे प्राप्त झाल्याची अधिकृत आकडेवारी आयकर विभागाने 1 ऑगस्ट रोजी जाहीर केली आहे.
उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी 31 ऑगस्ट पर्यंतची संधी
ज्या वैयक्तिक करदात्यांचे वार्षिक उत्पन्न 50 लाख रुपयांपर्यंत आहे आणि ज्यांच्या उत्पन्नाचा स्रोत पगार, एक गृहसंपत्ती व 5,000 रुपयांपर्यंतचे शेती उत्पन्न आहे, त्यांनी ITR-1 चा वापर करून आपले विवरणपत्र भरले आहे. दुसरीकडे, ज्यांचे उत्पन्न व्यवसाय किंवा प्रोफेशनशी संबंधित असून त्यांच्या खात्यांचे ऑडिट आवश्यक आहे, अशा करदात्यांसाठी (ITR-3 आणि ITR-4 वापरणारे) विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्टपर्यंत असणार आहे.
केवळ पगारावर अवलंबून राहण्याचा कल घटला
कर-दाखल प्लॅटफॉर्म 'क्लियरटॅक्स'च्या (ClearTax) विश्लेषणानुसार, भारतातील करदात्यांच्या कमाईच्या पद्धतींमध्ये आणि उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये लक्षणीय बदल पाहायला मिळत आहेत. करदाते आता केवळ पगारावर अवलंबून न राहता इतर मार्गांनी होणाऱ्या कमाईची माहितीही विवरणपत्रात नोंदवत आहेत. तसेच, यंदा शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा मालमत्ता विकून मिळणाऱ्या भांडवली नफ्यातून कमाई करणाऱ्यांचे प्रमाण AY 2022-23 मधील 9 टक्के वरून थेट 39 टक्केवर पोहोचले आहे.
हेही वाचा – Income Tax Return 2026: कोणाला मिळाली मुदतवाढ आणि कोणाला भरावा लागणार दंड? जाणून घ्या संपूर्ण नियम
स्वयंरोजगार आणि ऑनलाईन आयटीआर भरण्यात प्रचंड वाढ
देशात स्वयंरोजगार करणाऱ्या आणि स्वतःचा व्यवसाय असलेल्या नागरिकांमध्ये कर भरण्याबाबत मोठी जागृती दिसून येत आहे. व्यवसाय आणि प्रोफेशनमधून उत्पन्न मिळवून ITR भरणाऱ्यांचे प्रमाण AY 2022-23 मधील 4 टक्के वरून यंदा 26 टक्के पर्यंत वाढले आहे. विशेष म्हणजे, हा बदल सर्व वयोगटांत दिसला असून, ज्येष्ठ नागरिकांमध्ये ऑनलाईन पद्धतीने आयकर विवरणपत्र दाखल करणाऱ्यांच्या संख्येत 53 टक्के इतकी मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.