Navratri Kanya Pujan : नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर. या नऊ दिवसांमध्ये भक्त देवी दुर्गाची मनोभावे पूजा, आराधना आणि व्रत करतात, ज्यामुळे देवी प्रसन्न होऊन त्यांच्यावर कृपा करते अशी श्रद्धा आहे. या काळात देवीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. त्यापैकीच एक महत्त्वाचा आणि अत्यंत शुभ मानला जाणारा विधी म्हणजे कन्यापूजन. या विधीमध्ये निरागस कन्यांना देवीचे स्वरूप मानून त्यांची पूजा केली जाते. चला, जाणून घेऊया कन्यापूजनाचे महत्त्व, विधी..
कन्यापूजनाचे महत्त्व
नवरात्रीत कन्यापूजनाला विशेष महत्त्व आहे, कारण कन्यांना साक्षात देवीचे रूप मानले जाते. त्यांचे पूजन करणे म्हणजे प्रत्यक्ष देवीची पूजा करण्यासारखेच आहे असे मानले जाते. अशी श्रद्धा आहे की, या नऊ दिवसांमध्ये निरागस कन्यांच्या रूपात नवदुर्गा आपल्या घरी येतात आणि आशीर्वाद देऊन जातात. कन्यांचे पूजन करून त्यांना वस्त्र, दक्षिणा आणि प्रसाद दिल्यास देवी लवकर प्रसन्न होते आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते.
किती कन्यांचे पूजन करावे?
नवरात्रीत तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार कन्यापूजन करू शकता. मात्र, शास्त्रानुसार नऊ कन्यांचे पूजन करणे सर्वात उत्तम मानले जाते, कारण त्या देवीच्या नऊ रूपांचे प्रतीक असतात. या नऊ मुलींचे वय 2 ते 10 वर्षांपर्यंत असावे, असे सांगितले जाते. त्यांच्यासोबत एक लहान मुलाला बटू म्हणून पूजण्याचीही परंपरा आहे, जो हनुमानाचे प्रतीक मानला जातो.
हेही वाचा – Rajyog in Navratri 2025 : यंदाचे नवरात्र आहे खूपच खास.. हे दोन राजयोग या राशींना करणार मालामाल
अचूक कन्यापूजन विधी
नवरात्रीत कोणत्याही दिवशी कन्यापूजन करता येते, पण अष्टमी किंवा नवमीला हा विधी करणे सर्वात शुभ मानले जाते.
– निमंत्रण: कन्यापूजनाच्या दिवशी नऊ कन्यांना आदराने घरी बोलवा.
– स्वागत आणि पूजन: त्यांना बसण्यासाठी स्वच्छ आसन द्या. त्यांचे पाय स्वच्छ धुवावेत आणि त्यांना हळद-कुंकू लावावे.
– वस्त्र आणि दक्षिणा: कन्यांना साज-शृंगाराचे सामान, जसे की टिकली, बांगड्या, किंवा गजरा द्यावा. त्यानंतर त्यांना आपल्या क्षमतेनुसार दक्षिणा (पैसे) द्यावी.
– प्रसाद: देवीला नमस्कार करून सर्व कन्यांना भोजन द्यावे. यामध्ये काळे चणे, पुरी आणि शिरा किंवा खीर यांचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. गोड पदार्थ अवश्य असावा.
– आशीर्वाद: भोजन झाल्यावर सर्व कन्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत.
या साध्या विधीने तुम्ही देवी दुर्गाला प्रसन्न करू शकता आणि तिच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि धनसंपत्तीचा वर्षाव होऊ शकतो.
(Disclaimer : ही बातमी ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. जय महाराष्ट्र यातून कुठलाही दावा करत नाही)