Mumbai Ahmedabad Bullet Train launch Date : भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या प्रवासाची प्रतीक्षा आता संपणार असून येत्या काही वर्षांत हाय-स्पीड ट्रेन रुळावर धावताना दिसेल. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई ते अहमदाबाद या देशातील पहिल्या 508 किमी लांबीच्या बुलेट ट्रेन कॉरिडॉरचे काम सुमारे 80 टक्के पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाची पहिली सेवा 15 ऑगस्ट 2027 रोजी सुरत ते बिलीमोरा दरम्यान सुरू होईल. हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने पुढे नेला जाणार असून सुरुवातीला सुरत-बिलीमोरा मार्ग सुरू झाल्यानंतर ही सेवा वापी, अहमदाबाद, ठाणे आणि शेवटी संपूर्ण मुंबई-अहमदाबाद मार्गावर विस्तारली जाईल. पूर्ण प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असून बुलेट ट्रेन कमाल 320 किमी प्रतितास वेगाने धावेल.
दिल्ली होणार देशाचे मोठे बुलेट ट्रेन हब; 4 महत्त्वाचे मार्ग प्रस्तावित
मुंबई-अहमदाबाद प्रकल्पानंतर केंद्र सरकारने देशाची राजधानी दिल्लीला पुढील मोठे हाय-स्पीड रेल्वे हब म्हणून विकसित करण्याची योजना आखली आहे. यासाठी एकूण 4 नवीन बुलेट ट्रेन कॉरिडॉर प्रस्तावित करण्यात आले आहेत.
– दिल्ली-लखनऊ-वाराणसी कॉरिडॉर: सुमारे 813 ते 865 किमी लांबीच्या या मार्गावर 13 ते 15 स्थानके असतील. या अंतर्गत लखनऊ ते अयोध्या अशी 124 ते 135 किमीची एक वेगळी लिंक लाईनही जोडली जाईल. यामुळे दिल्ली ते लखनऊ प्रवास अवघ्या 2 तास 10 मिनिटांत, तर दिल्ली ते वाराणसी प्रवास 3 तास 50 मिनिटांत पूर्ण होईल.
– दिल्ली-वाराणसी-सिलिगुडी कॉरिडॉर: हा भारतातील सर्वात लांब बुलेट ट्रेन मार्ग ठरेल. सुमारे 1705 किमी लांबीचा हा मार्ग उत्तर भारताला थेट ईशान्य भारताशी जोडेल आणि पुढील टप्प्यात तो गुवाहाटीपर्यंत नेण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे दिल्ली ते सिलिगुडी दरम्यानचा 20 तासांचा प्रवास अवघ्या 6 तासांवर येईल.
– दिल्ली-जयपूर-उदयपूर-अहमदाबाद कॉरिडॉर: 886 किमी लांबीचा हा मार्ग दिल्ली, राजस्थान आणि गुजरात या 3 राज्यांच्या राजधान्यांना जोडेल. याच्या डीपीआरला मंजुरी मिळाली असून बजेटची प्रतीक्षा आहे.
– दिल्ली-अमृतसर-जम्मू कॉरिडॉर: सुमारे 450 ते 500 किमीच्या या मार्गामुळे दिल्ली ते अमृतसर प्रवास फक्त 2 तासांत होईल. भविष्यात हा मार्ग पठाणकोट, जम्मू आणि कटरापर्यंत वाढवला जाईल.
हैदराबादमधून धावणार 3 बुलेट ट्रेन; दक्षिण भारताचे चित्र बदलणार
रेल्वेमंत्र्यांनी तेलंगणासाठी 5400 कोटी रुपयांच्या रेल्वे निधीची घोषणा करताना हैदराबादला दक्षिण भारतातील प्रमुख हाय-स्पीड रेल्वे हब बनवण्याची माहिती दिली. हैदराबादला जोडणारे पुणे-हैदराबाद, हैदराबाद-चेन्नई आणि हैदराबाद-बेंगळुरू हे 3 नवीन कॉरिडॉर प्रस्तावित आहेत. या नव्या मार्गांमुळे शहरांमधील प्रवासाचा वेळ कमालीचा कमी होईल. नवे मार्ग सुरू झाल्यावर पुणे ते हैदराबाद प्रवास फक्त 2 तासांत, हैदराबाद ते मुंबई 2 तास 50 मिनिटांत, हैदराबाद ते अमरावती 1 तास 10 मिनिटांत, हैदराबाद ते चेन्नई 3 तास आणि हैदराबाद ते बेंगळुरू प्रवास अवघ्या 2 तास 35 मिनिटांत करणे शक्य होईल, ज्यामुळे प्रादेशिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल.
मुंबईजवळ समुद्राखालील भुयारी मार्गाचे आव्हान; जर्मन तंत्रज्ञानाचा वापर
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील सर्वात आव्हानात्मक भाग म्हणजे मुंबईनजीक बांधण्यात येत असलेला 20.37 किमी लांबीचा भुयारी मार्ग आहे. विशेष म्हणजे, यातील 7 किमीचा भाग समुद्राखालून जाणार आहे. जमीन पातळीपासून सुमारे 65 मीटर खोलीवर टनेल बोअरिंग मशीनच्या (TBM) साहाय्याने हे काम केले जात आहे. अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी या भुयाराचे काम करत असून, मार्च 2026 मध्ये जर्मनीतून समुद्रमार्गे आयात केलेल्या 2 विशेष टीबीएम मशिन्सचा वापर यासाठी केला जात आहे. नॅशनल हाय स्पीड रेल्वेपोरेशन लिमिटेडला (NHSRCL) खराब हवामानातही हे काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
देशात दरवर्षी 250 किमी ट्रॅक टाकणार; स्वदेशी बुलेट ट्रेन 'B35' ची निर्मिती
भारतीय रेल्वेने केवळ परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता स्वतःची पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन विकसित करण्यास सुरुवात केली आहे. 'B35' असे या स्वदेशी बुलेट ट्रेनचे नाव असून तिची प्राथमिक चाचणी नजीकच्या भविष्यात घेतली जाईल, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली. देशातील हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय बजेटमध्ये घोषित केलेल्या 7 हाय-स्पीड कॉरिडॉरवर सुमारे 2 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह प्राधान्याने काम सुरू केले आहे. देशात दरवर्षी सरासरी 250 किमी लांबीचे बुलेट ट्रेन ट्रॅक टाकण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट रेल्वे मंत्रालयाने ठेवले आहे.
शाश्वत आर्थिक विकासासाठी बुलेट ट्रेन ठरणार 'गेम चेंजर'
नवे बुलेट ट्रेन नेटवर्क देशांतर्गत वाहतूक व्यवस्थेत मोठी क्रांती घडवून आणेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते, या हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे केवळ प्रवासाचा वेळच कमी होणार नाही, तर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, पर्यटनाला चालना मिळेल आणि देशाच्या दीर्घकालीन आर्थिक विकासाला भक्कम आधार मिळेल. इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात आघाडीवर असलेल्या तेलंगणासारख्या राज्यांना या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे सर्वाधिक फायदा होणार असून भारतीय रेल्वे आता पूर्णपणे जागतिक पातळीवर झेप घेण्यासाठी सज्ज झाली आहे.