Ratna Debnath: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक मुसंडी मारली असतानाच, संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पाणीहाटी (Panihati) मतदारसंघातून एक भावनिक निकाल समोर येत आहे. कोलकाता येथील आर.जी. कर वैद्यकीय महाविद्यालयातील लैंगिंक अत्याचार आणि मृत्यू प्रकरणातील पीडितेच्या आई, रत्ना देबनाथ (Ratna Debnath) आता भाजपच्या आमदार बनण्याच्या मार्गावर आहेत.
20 हजारहून अधिक मतांची निर्णायक आघाडी
निवडणूक आयोगाने सायंकाळी 6:24 वाजता जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भाजप उमेदवार रत्ना देवनाथ यांनी पाणीहाटी मतदारसंघात आपली पकड मजबूत केली आहे. त्या त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी तृणमूल काँग्रेसचे (TMC) उमेदवार तीर्थंकर घोष यांच्यापेक्षा 20,463 मतांनी आघाडीवर आहेत. हा विजय केवळ राजकीय नसून, त्यांच्या वैयक्तिक संघर्षाला मतदारांनी दिलेला कौल असल्याचे मानले जात आहे.
“हा लढा शेवटच्या श्वासापर्यंत सुरूच राहील”
प्रसारमाध्यमांशी बोलताना रत्ना देवनाथ भावूक झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, “माझी मुलगी ही केवळ माझी नाही, तर संपूर्ण देशाची मुलगी आहे. संपूर्ण जगाचे लक्ष या मतदारसंघावर होते. माझा लढा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नव्हता. जोपर्यंत माझ्यात जीव आहे, तोपर्यंत मी न्यायासाठी माझा संघर्ष सुरूच ठेवीन. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे आणि विधानसभेत गेल्यावरही हा आवाज अविरत सुरू राहील.”
आर.जी. कर प्रकरणाचा राजकीय पडसाद
पश्चिम बंगालमध्ये भाजप सध्या 204 जागांवर आघाडीवर असून राज्यात सत्तापरिवर्तन होताना दिसत आहे. आर.जी. कर रुग्णालयातील त्या घटनेने संपूर्ण पश्चिम बंगाल ढवळून निघाले होते. भाजपने पीडितेच्या आईला पाणीहाटीतून उमेदवारी देऊन या प्रकरणाला निवडणुकीच्या केंद्रस्थानी ठेवले होते. मतदारांनी रत्ना देवनाथ यांच्या पाठीशी उभे राहून सरकारविरोधातील संताप मतपेटीतून व्यक्त केल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे.
हेही वाचा – West Bengal Election Result : बंगालमध्ये ‘पोरिबोर्तन’ का घडलं? भाजपचा विजय, दीदींचा पराभव… नेमकी कारणं काय?
#WATCH | North 24 Parganas | Mother of the victim of the RG Kar Medical College rape and murder case & BJP candidate Ratna Debnath from the Panihati seat, says, "My daughter is the daughter of the entire nation. The whole world was watching Panihati. My fight does not end here.… pic.twitter.com/Dnq22MWwvr — ANI (@ANI) May 4, 2026
पाणीहाटीचे नवे नेतृत्व
उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील पाणीहाटी मतदारसंघ हा टीएमसीचा बालेकिल्ला मानला जात असे. मात्र, रत्ना देवनाथ यांच्या विजयाने या ठिकाणी सत्तापालट होण्याची शक्यता आहे. अधिकृत निकाल जाहीर झाल्यानंतर त्या विधानसभेत पीडित महिलांच्या सुरक्षिततेचा आणि न्यायाचा आवाज म्हणून पाणीहाटीचे प्रतिनिधित्व करतील.