Snakebite Tragedy : गाढ झोपेत असलेल्या एका निष्पाप कुटुंबावर काळाने असा काही झडप घातली की, संपूर्ण गाव सुन्न झाले. ओडिशातील गजपती जिल्ह्यामध्ये मध्यरात्री घडलेल्या एका दुर्दैवी प्रसंगात घरात घुसलेल्या दोन विषारी सापांनी माय-लेकाचा बळी घेतला. 'कदमतल' या छोट्याशा खेड्यात घडलेल्या या थरारक घटनेने रायगडा परिसर पार हादरून गेला आहे. ललिता रैत आणि त्यांचा अवघ्या सात वर्षांचा चिमुरडा अमित कुमार अशी मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी आई-मुलाची नावे आहेत.
गाढ झोपेत झालेला जीवघेणा हल्ला
गुरुवारची रात्र रैत कुटुंबासाठी काळरात्र ठरली. अजय कुमार रैत हे आपली पत्नी ललिता, मुलगा अमित आणि अवघ्या दीड वर्षांच्या चिमुकल्या मुलीसोबत घरात निवांत झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक दोन विषारी सापांनी घराच्या आत प्रवेश केला. सर्वजण गाढ निद्रेत असताना सापांनी ललिता आणि अमित यांच्या हातावर जोरदार दंश केला. विष अंगात भिनू लागल्याने वेदनेने व्हिवळणाऱ्या माय-लेकाचा आक्रोश ऐकून अजय यांना अचानक जाग आली.
आरोग्य केंद्रातील शर्थ आणि अपयश
डोळ्यांसमोर फिरणारे साप पाहून अजय यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोघांनाही तातडीने रायगडा येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार सुरू केले खरा, परंतु प्रकृती वेगाने खालावत गेल्याने रुग्णांना तातडीने पार्लाखेमुंडी येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. दुर्दैवाने, डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न आणि औषधोपचार निष्फळ ठरले; उपचारादरम्यानच माय-लेकाने अखेरचा श्वास घेतला.
दैव बलवत्तर म्हणून दोघे बचावले
या काळीज पिळवटून टाकणाऱ्या दुर्घटनेत नशीब बलवत्तर म्हणून अजय कुमार आणि त्यांची दीड वर्षांची चिमुकली मुलगी पूर्णपणे सुखरूप राहिले. सापांची नजर या दोघांपर्यंत पोहोचली नाही आणि ते या भयंकर संकटातून थोडक्यात वाचले. एकाच घरातील दोन व्यक्तींचा असा तडफडून झालेला मृत्यू पाहून कदमतल गावावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा – Bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; खासगी बस खोल दरीत कोसळली; 8 प्रवाशांचा मृत्यू, 6 जण जखमी
खबरदारी आणि सतर्कतेची गरज
ग्रामीण भागात विशेषतः पावसाळ्यात आणि रात्रीच्या वेळी घरात साप शिरण्याचे प्रमाण वाढते. कानपूरसारख्या ठिकाणी कुटुंबीयांच्या प्रसंगावधानामुळे मुलाचे प्राण वाचल्याचे उदाहरण ताजे असताना, दुसरीकडे मात्र या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. झोपण्याच्या जागेची स्वच्छता, रात्रीच्या वेळी दिव्याचा वापर आणि सर्पदंश झाल्यास कोणत्याही अंधश्रद्धेला बळी न पडता मिळालेला त्वरित वैद्यकीय उपचारच अशा वेळी जीवनदायी ठरू शकतो.