Typhoon Dolphin : पूर्व चीनच्या किनाऱ्यावर रविवारी संध्याकाळी 5:30 वाजता 'डॉल्फिन' या तीव्र चक्रीवादळाने धडक दिली. ताशी 94 मैल (42 मीटर प्रति सेकंद) वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांमुळे पूर्व झेजियांग प्रांतातील तैझोऊ किनारपट्टी हादरली आहे. जुलै महिन्यातील 'नौल' चक्रीवादळानंतर यंदाच्या वर्षात प्रथमच प्रशासनाने या वादळाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च दर्जाचा 'रेड अलर्ट' जारी केला आहे. या अस्मानी संकटामुळे विमान, रेल्वे आणि सागरी वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला असून संपूर्ण प्रदेशात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
विमान व रेल्वे वाहतूक ठप्प
वादळाच्या भीषण प्रकोपामुळे शांघायमधील दोन्ही प्रमुख विमानतळांवरून 1384 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, तर हांगझोऊ आणि निंगबो विमानतळांवरही शेकडो उड्डाणे स्थगित करण्यात आली आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून शांघायमध्ये फेरी सेवा, काही सबवे लाईन्स आणि लांब पल्ल्याची बस वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. यांगत्झे नदीच्या त्रिभुज प्रदेशातील रेल्वे सेवा गुरुवारपर्यंत बाधित राहण्याची शक्यता आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने तैझोऊमधून 3 लाख 90 हजारांहून अधिक आणि शांघायमधून 1 लाखापेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.
मुसळधार पावसाचा इशारा; शांघायसह प्रमुख बंदरांमधील कामकाज बंद
जुलै महिन्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे चीनला आधीच मोठा आर्थिक आणि जीवितहानीचा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सर्व यंत्रणांना मदतकार्यासाठी सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. चीनमधील प्रमुख इंधन केंद्र असलेल्या झोउशान बंदरासह अनेक सागरी बंदरांचे कामकाज वादळामुळे ठप्प झाले आहे. हवामान खात्याने बुधवारपर्यंत फुजियान, झेजियांग, शांघाय, जिआंग्सू, हेबेई आणि राजधानी बीजिंगसह महत्त्वाच्या भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.