Snow Storm in Winter in America : अमेरिकेच्या अर्ध्या भागाला सध्या एका भीषण हिवाळी वादळाने विळखा घातला असून, यामुळे देशातील जनजीवन पूर्णपणे विसकळीत झाले आहे. रॉकी पर्वतापासून ते पूर्व किनारपट्टीपर्यंत पसरलेल्या या वादळामुळे सुमारे 200 दशलक्ष (20 कोटी) पेक्षा जास्त अमेरिकन नागरिकांना हाडं गोठवणाऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे. अनेक राज्यांनी आधीच हवामान आणीबाणी (Weather Emergency) जाहीर केली असून आर्क्टिक वाऱ्यांमुळे तापमानात प्रचंड घट झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे लाखो घरांचा वीजपुरवठा खंडित होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत अमेरिकेच्या 14 राज्यांत आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.
विमान वाहतुकीला मोठा फटका
वादळाच्या तीव्रतेमुळे हवाई वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी 3,200 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द करण्यात आली, तर रविवारी हा आकडा 4,800 च्या पुढे गेला आहे. एकूण 7,000 पेक्षा जास्त विमान फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. शिकागो आणि डॅलस सारख्या प्रमुख विमानतळांवर विमानांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. रस्ते निसरडे झाल्याने अनेक महामार्गांवर प्रवास करणे धोकादायक बनले असून, प्रशासनाने नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.
बर्फ आणि बर्फाच्छादित पावसाचा इशारा
हवामान तज्ज्ञांच्या मते, हे या हंगामातील सर्वात शक्तिशाली वादळ आहे. रॉकी पर्वत आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये 1 फुटापेक्षा जास्त बर्फ पडण्याची शक्यता आहे. विशेषतः लुईझियाना, मिसिसिपी आणि टेनेसी या राज्यांमध्ये 'कॅटास्ट्रोफिक' म्हणजेच विनाशकारी बर्फाच्छादित पाऊस (Freezing Rain) पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. झाडांवर आणि वीजवाहिन्यांवर 1 इंचापर्यंत बर्फ साचल्यास ते चक्रीवादळासारखे नुकसान करू शकतात, ज्यामुळे वीजपुरवठा दीर्घकाळ खंडित होऊ शकतो.
प्रशासनाची तयारी आणि उपाययोजना
भीषण परिस्थिती पाहता नॅशनल गार्डला पाचारण करण्यात आले आहे. वॉशिंग्टन डीसीमध्ये 8 इंचांपर्यंत बर्फ पडण्याचा अंदाज असल्याने महापौर म्युरिएल बाऊझर यांनी लष्करी मदतीची विनंती केली आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सी (FEMA) पूर्णपणे सज्ज असून 7 दशलक्ष जेवण पॅकेटस्, 6,00,000 ब्लँकेट आणि 300 जनरेटर पूर्व-स्थित (Pre-positioned) करण्यात आले आहेत. टेक्सासमध्ये 2021 सारखी परिस्थिती उद्भवू नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जात असून वीजनिर्मिती केंद्रे हाय अलर्टवर आहेत.
दैनंदिन आयुष्यावर परिणाम
थंडीचा कडाका इतका वाढला आहे की डकोटा आणि मिनेसोटा सारख्या राज्यांमध्ये तापमान उणे 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. शिकागोमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून चर्चमधील प्रार्थना ऑनलाईन घेतल्या जात आहेत. लुईझियानामधील प्रसिद्ध कार्निव्हल मिरवणुका आणि नॅशविलेमधील संगीत कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. ओक्लाहोमा सिटीमध्ये 1 फुटापर्यंत बर्फ साचल्याने रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. हे वादळ पूर्व दिशेला सरकत असून, त्यातून सावरण्यासाठी देशाला अनेक दिवस लागू शकतात.
झोहरान ममदानींची परीक्षा
या संकटामुळे 3,000 किमीच्या पट्ट्याला धोका निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या दक्षिण भागात टेक्सास ते न्यू इंग्लंड या तीन हजार किलोमीटरपेक्षा जास्त भागांत हे हिमवादळ येईल. टेक्सासपासून ओक्लाहोमा, वॉशिंग्टन डी.सी., न्यूयॉर्क आणि बोस्टन येथे 30 सेंमीपेक्षा जास्त बर्फ पडण्याचा अंदाज आहे. मेम्फिस, नॅशविल, बाल्टिमोर आणि फिलाडेल्फिया ही शहरेही बर्फाच्या चादरीखाली झाकली जाऊ शकतात. मिनेसोटा आणि नॉर्थ डाकोटाच्या काही भागात उणे 46 अंश सेल्सियसपर्यंत तापमान घसरू शकते. न्यूयॉर्कच्या महापौरपदाची शपथ घेतल्यापासून झोहरान ममदानी यांच्यासाठी या हिमवादळाच्या रूपाने पहिलीच मोठी परीक्षा होणार आहे. न्यूयॉर्कचे सफाई कामगार देशातील सर्वात मोठी हिमविरोधी मोहीम हाती घेणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. न्यूयॉर्कमध्ये रविवारी वादळ धडकण्याची शक्यता आहे.