US Iran Conflict: अमेरिका आणि इराण यांच्यातील लष्करी संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला आहे. नुकतेच अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर भीषण हल्ले करत त्यांचे मोठे नुकसान केले होते. या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही अमेरिकन तळांना लक्ष्य केले. या वाढत्या तणावाच्या दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. ट्रम्प यांच्या मते, अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त कारवायांमुळे इराणची लष्करी ताकद पूर्णपणे मोडकळीस आली असून त्यांचे सर्वोच्च कमांडर मारले गेले आहेत. इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी हे गेल्या आठवड्यात त्यांचे वडील अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराला देखील अनुपस्थित होते, याकडे लक्ष वेधत ट्रम्प यांनी मोजतबा हे '90 टक्के संपले आहेत' असा दावा केला.
'इराणचे नौदल आणि हवाई दल पूर्णपणे उद्ध्वस्त' – ट्रम्प यांचा फॉक्स न्यूजवर दावा
फॉक्स न्यूजला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत बोलताना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणच्या लष्करी स्थितीवर थेट भाष्य केले. ते म्हणाले, "इराणकडे आता ना कार्यक्षम नौदल उरले आहे, ना हवाई दल; त्यांचे सर्व काही आम्ही नष्ट केले आहे. त्यांची विमानविरोधी संरक्षण यंत्रणा ढासळली असून त्यांचे मुख्य नेतृत्व आता शिल्लक राहिलेले नाही." ट्रम्प यांनी आत्मविश्वासाने सांगितले की, या युद्धाने इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाला संपवले आहे. "ते आता इतिहास जमा झाले आहेत. खामेनेई पूर्णपणे संपले आहेत," असे रोखठोक विधान त्यांनी केले.
अयातुल्ला अली खामेनीचा मृत्यू
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी हे संघर्षाच्या अगदी सुरुवातीलाच, म्हणजेच 28 फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्यात मारले गेले होते. त्यानंतर त्यांचे सुपुत्र मोजतबा खामेनेई हे देखील 28 फेब्रुवारीपासून एकदाही जाहीरपणे समोर आलेले नाहीत. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात ते गंभीर जखमी झाल्याची जोरदार चर्चा सुरू होती. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी, "त्यांचा मुलगाही आता 90 टक्के संपला आहे," असे सांगत मोजतबा यांच्या गंभीर परिस्थितीवर शिक्कामोर्तब केले.
हेही वाचा – Pub Fire Tragedy: रविवारची रात्र ठरली अखेरची! पबमध्ये भीषण आग, 27 जणांनी गमावला जीव; 60 हून अधिक जखमी
लष्करी कारवाई पुन्हा सुरू करण्याचे ट्रम्प यांचे संकेत
गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली युद्धबंदी (Ceasefire) मागील आठवड्यात दोन्ही बाजूंकडून झालेल्या नव्या हल्ल्यांमुळे अधिकृतपणे संपुष्टात आली आहे. ट्रम्प यांनी अमेरिकन काँग्रेसला कायदेशीररित्या कळवले आहे की, इराणच्या विविध संवेदनशील ठिकाणांवर थेट हल्ले चढवून अमेरिकेने पुन्हा एकदा लष्करी मोहीम सुरू केली आहे. याशिवाय, आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि जहाजांना सुरक्षित प्रवास पुरवण्यासाठी अमेरिका आता इतर देशांच्या जहाजांवर सुरक्षा शुल्क आकारणार असल्याचेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.