Bomb Threats : पंजाबमधील मोहाली शहरात आज, बुधवार 11 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी एकामागून एक तब्बल 10 नामांकित शाळांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या या ईमेलमध्ये दुपारी 1:11 वाजता मोहालीच्या शाळांमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचा धक्कादायक उल्लेख करण्यात आला होता. या धमकीनंतर शाळा प्रशासन आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने तत्काळ सर्व शाळा रिकाम्या करून विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी पाठवण्याचे आदेश दिले आहेत.
नामांकित शाळांना केले जातेय लक्ष्य; पालकांची उडाली धांदल
धमकी मिळालेल्या शाळांमध्ये मानव मंगल स्कूल, शिवालिक पब्लिक स्कूल, दून इंटरनॅशनल आणि लर्निंग पाथ्स यांसारख्या मोठ्या शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. सकाळी शाळा सुरू झाल्यानंतर काही वेळातच हे ईमेल प्राप्त झाले. यामुळे शाळा व्यवस्थापनाने पालकांना 'इमर्जन्सी मेसेज' पाठवून तातडीने पाल्यांना घरी नेण्यास सांगितले. अनेक बस विद्यार्थी घेऊन वाटेतच होत्या, त्यांनाही तातडीने माघारी बोलावण्यात आले. चिमुकल्या मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी शाळेच्या गेटवर पालकांनी मोठी गर्दी केली होती.
मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणि शोधमोहीम
घटनेचे गांभीर्य ओळखून मोहालीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) हरमनदीप सिंह हंस यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 300 पोलीस कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. 'अँटी-सॅबोटेज' टीम, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (BDDS) तसेच श्वान पथक तैनात करण्यात आले असून प्रत्येक शाळेच्या कोपऱ्या कोपऱ्याची तपासणी केली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून फत्तेगड साहिब आणि रूपनगर जिल्ह्यातून अतिरिक्त सुरक्षा टीम पाचारण करण्यात आल्या आहेत. संपूर्ण मोहाली शहरात हाय-अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
अफवा की कट? तपासाचे चक्र फिरले
पोलीस तपासात असे समोर आले आहे की, कालच दिल्ली आणि चंदीगडमधील काही शाळांनाही अशाच प्रकारचे धमकीचे ईमेल आले होते, जे नंतर तपासात खोटे (Hoax) आढळले होते. मात्र, मोहालीच्या बाबतीत पोलीस कोणतीही जोखीम घेण्यास तयार नाहीत. सायबर सेलच्या मदतीने ईमेलचा आयपी (IP) ॲड्रेस ट्रॅक केला जात असून हा खोडसाळपणा आहे की यामागे काही मोठा कट आहे, याचा तपास सुरू आहे. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
राजधानी दिल्लीपासून पंजाबपर्यंत दहशतीचे सत्र
गेल्या 2 दिवसांपासून उत्तर भारतात शाळांना धमक्या मिळण्याचे सत्र सुरू आहे. यापूर्वी दिल्ली, अमृतसर, जालंधर आणि पतियाळा येथील शाळांनाही असेच धमक्यांचे ईमेल आले होते. वारंवार घडणाऱ्या या प्रकारांमुळे पालकांमध्ये संतापाची लाट असून मुलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सध्या मोहालीतील परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेत आहेत. तपास पूर्ण होईपर्यंत या शाळांमधील वर्ग बंद ठेवण्यात आले आहेत.