Coaching Center Fire: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील अलीगंज परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. येथील एका कोचिंग सेंटरला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे कोचिंग सेंटरमधील अनेक विद्यार्थी आतमध्येच अडकून पडले. आगीच्या भयंकर ज्वाळा आणि धुराचे लोट यामुळे प्रचंड घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हताश होऊन थेट इमारतीवरून खाली उड्या मारण्यास सुरुवात केली. या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला असून, परिसरात कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
3 मजली व्यावसायिक इमारतीला आग
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तपशिलानुसार, दुपारी अलीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उषा मेहता मार्गावर असलेल्या एका 3 मजली व्यावसायिक इमारतीला अचानक आग लागली. दुपारी सुमारे 3:00 वाजता या इमारतीमधील कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये आग लागल्याचा कॉल अग्निशमन विभागाला मिळाला. आगीची भीषणता पाहता, ती आटोक्यात आणण्यासाठी हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म वाहनासह तब्बल 14 अग्निशमन गाड्या तात्काळ घटनास्थळी तैनात करण्यात आल्या. अग्निशमन दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सुरुवातीला आतमध्ये सुमारे 10-12 लोक अडकल्याची माहिती मिळाली होती, परंतु आग अत्यंत वेगाने पसरल्यामुळे सुरुवातीला जवानांना इमारतीत प्रवेश करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
#WATCH | Uttar Pradesh | Firefighting and rescue operations underway at a coaching centre in Aliganj, Lucknow. Some people are feared trapped inside the building. pic.twitter.com/p4QQiFLTpD — ANI (@ANI) June 22, 2026
प्रत्यक्षदर्शींची धावपळ: जखमींवर उपचार सुरू
घटनास्थळी उपस्थित असलेल्या अमन नावाच्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले, “या इमारतीत एक ग्रंथालय (लाइब्ररी) आणि संगणक प्रशिक्षण संस्था चालवली जाते. आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा इमारतीतून प्रचंड धूर निघत होता. आम्ही स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने 5-6 जणांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र, आग वाढल्याने एका व्यक्तीने घाबरून इमारतीवरून खाली उडी मारली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे.” काही लोक अजूनही आत अडकल्याची भीती व्यक्त होत असून अग्निशमन दल आणि पोलिस प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य राबवले जात आहे.’
हेही वाचा – NEET UG Paper Leak: नीट-UG चा पेपर पुन्हा फुटला? सोशल मीडियावरील ‘त्या’ व्हिडिओवर NTA चा मोठा खुलासा
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे प्रशासनाला कडक निर्देश
लखनऊमधील या भीषण अग्निकांडाची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनाविलंब घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री योगी यांनी मदत आणि बचाव कार्य अधिक वेगाने करण्याचे निर्देश देत, दुर्घटनेतील जखमींना तात्काळ आणि सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळवून देण्याची व्यवस्था करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. संपूर्ण प्रशासनाला सर्व स्तरांवर सतर्क राहण्याच्या सूचना देतानाच, मुख्यमंत्र्यांनी या बचावकार्यावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले आहे. तसेच जखमी विद्यार्थी व नागरिक लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.