Gaza Israel Conflict: पॅलेस्टाईन आणि गाझा पट्टीत इस्रायली सैन्याकडून लहान मुलांना अत्यंत क्रूरपणे लक्ष्य केले जात असल्याचा धक्कादायक खुलासा संयुक्त राष्ट्राच्या (UN) एका अहवालात करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्राच्या स्वतंत्र आंतरराष्ट्रीय तपास आयोगाने जिनिव्हा येथे 'UNHRC' समोर हा तपास अहवाल सादर केला. ओडिशा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आणि या आयोगाचे अध्यक्ष एस. मुरलीधर यांनी या अहवालातील भीषण वास्तव जगासमोर आणले आहे. इस्रायली सैन्याकडून पॅलेस्टिनी बालकांना जाणीवपूर्वक आणि नियोजित पद्धतीने संपवले जात असल्याचे यात म्हटले आहे. या गंभीर आरोपांबाबत आयोगाने इस्रायल सरकारकडे स्पष्टीकरण मागितले होते, मात्र त्यांनी तपासात कोणत्याही प्रकारचे सहकार्य करण्यास नकार दिल्याचे मुरलीधर यांनी स्पष्ट केले.
ड्रोन आणि स्नायपर्सचा 'डेथ गेम'
अहवालातील माहितीनुसार, 7 ऑक्टोबर 2023 ते 7 ऑक्टोबर 2025 या दोन वर्षांच्या कालावधीत वेस्ट बँक आणि पूर्व येरुशलमसह गाझा परिसरात 20,000 हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे, तर 44,000 पेक्षा जास्त मुले गंभीर जखमी झाली आहेत. मुलांना प्रामुख्याने दोन क्रूर मार्गांनी लक्ष्य केले जात आहे. पहिला मार्ग म्हणजे दाट लोकवस्तीच्या भागांवर थेट शक्तिशाली बॉम्बफेक करणे. तर दुसरा आणि अधिक भयंकर मार्ग म्हणजे अत्याधुनिक 'क्वाडकॉप्टर' (ड्रोन) आणि स्नायपर रायफल्सचा वापर करणे. या ड्रोन्सना हाय-प्रिसिजन थर्मल इमेजिंग कॅमेरे बसवले आहेत, ज्यामुळे दूर बसलेल्या ऑपरेटरला लहान मुलांची शरीरे स्पष्ट दिसतात. धक्कादायक बाब म्हणजे, काही इस्रायली सैनिकांनी कॅमेऱ्यासमोरच कबुली दिली आहे की, नियंत्रण कक्षात दूर बसून या अत्याधुनिक उपकरणांद्वारे लहान मुलांना मारणे त्यांच्यासाठी एखाद्या व्हिडिओ गेम खेळण्यासारखे आहे.
पांढरा झेंडा दाखवणाऱ्यांवरही गोळीबार
हा अहवाल इस्रायली सैनिकांच्या अमानुषतेवर तीव्र प्रकाश टाकतो. मुलांना कायमचे अपंग किंवा ठार करण्यासाठी स्नायपर्स थेट त्यांच्या डोक्यावर किंवा मानेवर 'सिंगल शॉट' मारत आहेत. आईचे दूध पिणाऱ्या अवघ्या 10 महिन्यांच्या एका निष्पाप बाळाच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली, ज्यामुळे ते आयुष्यभरासाठी अपंग झाले. इतकेच नव्हे तर, हातात संरक्षणाचा पांढरा झेंडा घेऊन उभी असलेली मुले, वैद्यकीय सेवेतील रुग्णवाहिका कर्मचारी आणि जीव वाचवण्यासाठी रेड क्रॉसच्या दिशेने धावणाऱ्या कुटुंबांवरही निर्घृणपणे गोळीबार करण्यात आला आहे.
अनाथ बालकांसाठी रुग्णालयांची नवी संज्ञा
दरम्यान, गाझामधील भीषण परिस्थितीमुळे तेथील डॉक्टरांना रुग्णालयात एक नवीन वैद्यकीय श्रेणी सुरू करावी लागली आहे, ज्याला 'WCNSF' (Wounded Child With No Surviving Family – म्हणजेच जखमी मूल ज्याचे कुटुंब आता जिवंत नाही) असे नाव देण्यात आले आहे. अवघ्या दोन महिन्यांत अशा हजारो बालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, ज्यांचे संपूर्ण कुटुंब या युद्धात नष्ट झाले आहे. इस्रायली लष्कराने अनाथालये, रुग्णालये आणि शाळांनाही सोडलेले नाही. गाझामधील 97 टक्के शाळा आणि 32 पैकी 27 विद्यापीठे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. परिणामी, येथील विद्यार्थी गेल्या 3 वर्षांपासून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून पूर्णपणे वंचित राहिले आहेत.