मुंबई: बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायिका आई झाली असल्याचं समोर आलं आहे. ‘इंडियन आयडल 12’ मधून लोकप्रिय झालेली गायिका सायली कांबळे नुकतीच आई बनली आहे. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही आनंदाची बातमी तिने सोशल मीडियावर शेअर केली. मात्र सध्या तिने बाळाचे नाव किंवा चेहरा प्रेक्षकांसमोर आणलेला नाही. सायलीने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लहान पायांची छायाचित्रे शेअर करत लिहिले, ‘एक छोटासा चमत्कार, प्रेमाचा आजीवन अनुभव. आम्हाला मुलगा झाला आहे. तुमच्या सर्व प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद. धवल आणि सायली.’ या पोस्टवर गायिका श्रेया घोषालनेही कमेंट करून सायलीला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच चाहत्यांनीही तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
सायली कांबळे ‘इंडियन आयडल 12’ ची दुसरी उपविजेती होती. या सीझनमध्ये पवनदीप राजन विजेत्या ठरला होता, तर अरुणिता कांजीलाल पहिली उपविजेती होती. नोव्हेंबर 2020 ते ऑगस्ट 2021 दरम्यान प्रसारित झालेल्या या सीझनमध्ये विशाल, नेहा आणि हिमेश जज होते, तर आदित्य नारायण होस्ट होते. सायली मुंबईची रहिवासी असून, तिचे पूर्ण नाव सायली किशोर कांबळे आहे. लहानपणापासूनच तिने शास्त्रीय गायनाचे प्रशिक्षण घेतले असून, मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीही मिळवली आहे.
ऑडिशन दरम्यान तिने सांगितले की, तिची आई गृहिणी असून तिचे वडील रुग्णवाहिका चालक आहेत. हिमेश रेशमिया, नेहा कक्कर आणि विशाल ददलानी यांनी तिच्या आवाजाचे कौतुक केले होते. सायलीने तिचा बॉयफ्रेंड धवलशी 24 एप्रिल 2022 रोजी लग्न केले, ज्याआधी दोघे 2018 पासून एकमेकांना डेट करत होते. लग्नाच्या तीन वर्षांनी सायली आई बनली आहे. या क्षणाचा आनंद तिने चाहत्यांसह शेअर केला आहे.