Boat Capsized: बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील ‘बाढ’ (Barh) उपविभागात असणाऱ्या उमानाथ गंगा घाटाजवळ एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. येथे गंगेच्या पात्रात प्रवाशांनी भरलेली एक नाव उलटल्याने अनेकांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या नावेवर अंदाजे 14 ते 15 लोक स्वार होते, ज्यातील सुमारे 7 लोक बुडाल्याची प्राथमिक शक्यता आहे. दुर्घटना घडताच जवळच असलेल्या दुसऱ्या एका नावेच्या मदतीने काही प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र, नक्की किती लोकांचा यात जीव गेला आहे, याची अधिकृत पुष्टी अद्याप प्रशासनाकडून झालेली नाही.
हेही वाचा – Karnataka : राज्यपाल बाहेरगावी, सिद्धरामय्या अजूनही देऊ शकतात का राजीनामा?; कर्नाटकच्या राजकारणात खळबळ
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घडली दुर्घटना
या दुर्घटनेबाबत माहिती देताना बाढचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) रामकृष्ण यांनी सांगितले की, “परिसरात सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही लहान नाव उलटल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. या नावेवर एकूण 14 लोक स्वार होते. त्यापैकी 7 लोक सुखरूप असून, आतापर्यंत 2 मृतदेह हाती लागले आहेत. उर्वरित 5 जण अद्याप बेपत्ता आहेत.” बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यासाठी आणि युद्धपातळीवर बचावकार्य राबवण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (SDRF) पथके तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आली असून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
#WATCH | Several dead after a boat capsized in the Ganga River near Umanath Ghat in the Barh subdivision of Patna district, Bihar pic.twitter.com/u2ucsGQvsn — ANI (@ANI) May 28, 2026
मुंबईत मासेमारीची नाव उलटून एकाचा मृत्यू, एक जखमी
दरम्यान, दुसऱ्या एका वेगळ्या घटनेत मुंबईतील समुद्रातही नौका दुर्घटना झाल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी संध्याकाळी 6.15 च्या सुमारास पश्चिम उपनगरातील खार डंडा येथील ‘वारीन पाडा’ दीपगृहाजवळ मासेमारीची एक नाव उलटली. या अपघातात एका 55 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसरी व्यक्ती जखमी झाली आहे. पालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेतील दोन्ही पीडितांना तातडीने पालिकेच्या ‘भाभा रुग्णालयात’ नेण्यात आले होते. मात्र, तिथे अशोक किशन राठोड (वय 55) यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले, तर केतन राठोड (वय 32) यांच्यावर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या घटनेची नोंद करून पोलीस पथक पुढील तपास करत आहे.