CBSE Three Language Rule: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) नव्या त्रि-भाषा धोरणाबाबत महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या निर्णयामुळे सध्या इयत्ता 10 व मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बोर्डाने स्पष्ट केले आहे की, नवीन धोरणाचा परिणाम सध्याच्या 10 वी च्या बॅचवर होणार नाही. तसेच, सध्या इयत्ता 7वी, 8वी आणि 9वी मध्ये शिकणारे विद्यार्थी जेव्हा 10वी मध्ये पोहोचतील, तेव्हाही त्यांना तिसऱ्या भाषेची बोर्ड परीक्षा द्यावी लागणार नाही. त्रि-भाषा धोरण लागू करताना संक्रमण काळातील विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण येऊ नये, यासाठी ही विशेष सवलत देण्यात आली आहे.
नवीन नियमांनुसार भाषा निवडीचे निकष
CBSE च्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या 3 भाषांपैकी किमान 2 भाषा भारतीय असणे अनिवार्य राहणार आहे. जर दोन भारतीय भाषा आधीच निवडल्या असतील, तर तिसरी भाषा (R3) म्हणून परदेशी भाषा घेण्याची मुभा विद्यार्थ्यांना असेल. सध्या इयत्ता 7वी, 8वी आणि 9वी मध्ये शिकणाऱ्या आणि आधीच 2 परदेशी भाषा निवडलेल्या विद्यार्थ्यांनाही एका भारतीय भाषेसह त्यांचा अभ्यास सुरू ठेवण्याची परवानगी बोर्डाने दिली आहे.
2026-27 आणि 2027-28 या शैक्षणिक वर्षांसाठी विशेष व्यवस्था
शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये इयत्ता 10वी मध्ये असलेले विद्यार्थी सध्याच्या द्वि-भाषा पद्धतीनुसारच शिक्षण पूर्ण करतील. त्यांच्यासाठी तिसरी भाषा अनिवार्य असणार नाही. दुसरीकडे, 2026-27 मध्ये इयत्ता 9वी मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना 3 भाषांचा अभ्यास करावा लागेल. मात्र, तिसऱ्या भाषेचे मूल्यमापन केवळ शाळास्तरावरील अंतर्गत परीक्षेद्वारे केले जाईल. हीच तुकडी 2027-28 मध्ये 10वी मध्ये गेल्यानंतर त्यांना तिसऱ्या भाषेची स्वतंत्र बोर्ड परीक्षा द्यावी लागणार नाही.
भारतीय आणि परदेशी भाषांचे स्पष्ट वर्गीकरण
CBSE ने आपल्या अभ्यासक्रमात भारतीय आणि परदेशी भाषांचे स्वतंत्र वर्गीकरण केले आहे. भारतीय भाषांमध्ये हिंदी, संस्कृत, मराठी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, बंगाली, पंजाबी, गुजराती, ओडिया आणि आसामी यांसह विविध भाषांचा समावेश करण्यात आला आहे. तर इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, अरबी आणि स्पॅनिश या भाषा परदेशी किंवा बिगर-भारतीय भाषांच्या गटात ठेवण्यात आल्या आहेत.
2030-31 पर्यंत पूर्ण अंमलबजावणी
नवीन धोरणानुसार भाषा विषयांना R1, R2 आणि R3 अशा तीन स्तरांमध्ये विभागले जाणार आहे. R1 ही विद्यार्थ्याची मुख्य भाषा, R2 ही दुसरी भाषा आणि R3 ही तिसरी भाषा असेल. R1 आणि R2 या दोन्ही भाषा एकसारख्या असू शकणार नाहीत. हे त्रि-भाषा धोरण शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी साठी लागू करण्यात येणार असून, टप्प्याटप्प्याने 2030-31 पर्यंत ते इयत्ता 10 वी पर्यंत पूर्णपणे लागू केले जाईल. या अभ्यासक्रमात हिंदी आणि इंग्रजीसह एकूण 42 भाषांचा समावेश करण्यात आला असून, त्यामध्ये संविधानाच्या 8वी अनुसूचीतील सर्व भाषा तसेच विविध प्रादेशिक आणि परदेशी भाषांचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध राहणार आहे.