Central Govt Drug Ban: सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि बाजारातील औषधांच्या अनिर्बंध वापराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. देशात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या 16 निश्चित-मात्रेच्या संयोजन औषधांच्या (Fixed-Dose Combination – FDC) उत्पादन, विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारने तात्काळ प्रभावाने पूर्ण बंदी घातली आहे. या औषधांना कोणताही वैज्ञानिक किंवा उपचारात्मक आधार नसल्याचे आणि त्यांच्या वापरामुळे फायद्यापेक्षा हानी होण्याचा धोका अधिक असल्याचे स्पष्ट करत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. जनतेला केवळ सुरक्षित, प्रभावी आणि वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित औषधेच मिळावीत, हा यामागील मुख्य उद्देश आहे.
काय आहेत एफडीसी (FDC) औषधे?
'एफडीसी' म्हणजेच निश्चित-मात्रेची संयोजन औषध प्रणाली, ज्यामध्ये दोन किंवा अधिक सक्रिय औषधी घटक (Active Pharmaceutical Ingredients – APIs) एका ठराविक प्रमाणात एकत्र करून एकच गोळी, सिरप किंवा मलम तयार केले जाते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तज्ज्ञ समितीचा आढावा
सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निर्देशानुसार, औषध तांत्रिक सल्लागार मंडळाने (DTAB) विविध मिश्र औषधांची सखोल तपासणी करण्यासाठी एका विशेष तज्ज्ञ समितीची स्थापना केली होती. या समितीने केलेल्या वैज्ञानिक पुनरावलोकनानंतर, ज्या औषधांचे संयोजन अतार्किक, उपचारात्मकदृष्ट्या असमर्थनीय आणि मानवी शरीरासाठी घातक आढळले, अशा 16 औषध-प्रकारांवर बंदी घालण्याची शिफारस केली. त्यानुसार, औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायदा, 1940 च्या कलम 26अ अंतर्गत मंत्रालयाने ही अधिसूचना जारी केली आहे.
बंदी घातलेल्या औषधांमध्ये नेमके काय समाविष्ट आहे?
प्रतिबंधित करण्यात आलेल्या यादीमध्ये मानवी वापरासाठीच्या विविध श्रेणींमधील औषधांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील औषध-संयोजनांवर बंदी घालण्यात आली आहे:
वेदना आणि स्नायू शिथिल करणारी औषध मिश्रणे:
ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड आणि इथोहेप्टाझिन, डायसायक्लोमाइन, पॅरासिटामॉल आणि क्लिडिनियम ब्रोमाइड, डायसायक्लोमाइन, पॅरासिटामॉल, क्लिडिनियम ब्रोमाइड आणि क्लोरडायझेपॉक्साइड; तसेच पॅरासिटामॉल व लिग्नोकेन यांसारखी औषधे.
मधुमेहावरील औषधे: ग्लिक्लाझाइड आणि क्रोमियम पिकोलिनेट यांचे मिश्रण.
प्रतिजैविक-आधारित मिश्रणे (Antibiotics): अमोक्सिसिलिन सोबत सेराटिओपेप्टिडेस, अमोक्सिसिलिन सोबत सेराटिओपेप्टिडेस आणि लॅक्टोबॅसिलस स्पोरोजीन्स, अमोक्सिसिलिन सोबत क्लोक्सासिलिन, लॅक्टिक ॲसिड बॅसिलस आणि सेराटिओपेप्टिडेस, सेफाड्रॉक्सिल सोबत प्रोबेनेसिड आणि सेफ्युरोक्झाइम सोबत सेराटिओपेप्टिडेस
काही स्किन केअर आणि सौंदर्य उत्पादनांनाही फटका
केवळ गोळ्या किंवा सिरपच नव्हे, तर त्वचेच्या काळजीसाठी (Skin care) वापरल्या जाणाऱ्या अनेक उत्पादनांवरही या अधिसूचनेचा प्रभाव पडला आहे. कोरफड किंवा कोरफडीच्या अर्कासोबत (Aloe vera extract) व्हिटॅमिन ई, जोजोबा तेल, संत्र्याचे तेल, गव्हाच्या कोंड्याचे तेल, टी ट्री ऑइल, अॅलॅनटॉइन आणि डी-पँथेनॉल यांसारख्या घटकांचे अवाजवी मिश्रण असलेल्या अनेक त्वचारोगविषयक उत्पादनांचा या बंदीच्या यादीत समावेश आहे.
देशभरात कडक अंमलबजावणीचे आदेश
केंद्र सरकारने सर्व राज्यांचे औषध नियंत्रक, नियामक प्राधिकरणे आणि अंमलबजावणी संस्थांना या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच सर्व औषध उत्पादक, आयातदार आणि वितरकांना तातडीने सुधारणात्मक उपाययोजना करत बाजारातून या औषधांचा पुरवठा थांबवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. औषधांच्या अविवेकी वापरामुळे रुग्णांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये म्हणून सरकारने ही कठोर पावले उचलली आहेत.