Mahindra Thar Ban in Goa : गोव्याचे निसर्गरम्य समुद्रकिनारे आणि सुंदर रस्ते अनुभवण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची पहिली पसंती असलेल्या 'महिंद्रा थार' गाड्यांवर आता बंदी येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गोव्यात गेल्या काही महिन्यांत रेंटल थार गाड्यांचे भीषण आणि जीवघेणे अपघात मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. या जीवघेण्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी गोवा सरकारने थेट नवीन थार आणि 'थार रॉक्स'च्या रेंटल परवान्यांवर (Rent-a-Car) पूर्णपणे बंदी घालण्याची कायदेशीर तयारी सुरू केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री मौविन गोडिन्हो यांनी एका उच्चस्तरीय बैठकीनंतर हा कडक प्रस्ताव 'स्टेट ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी' समोर मंजुरीसाठी ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
ताकदवान इंजिन आणि चालकांची मद्यधुंद मानसिकता कारणीभूत
परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, थार गाड्या गोव्याच्या रस्त्यांवरून हद्दपार करण्यामागे या गाड्यांची अफाट ताकद आणि त्या चालवणाऱ्या पर्यटकांची बेजबाबदार मानसिकता कारणीभूत आहे. या गाड्यांची इंजिन पॉवर खूप जास्त असते, ज्यामुळे गोव्याच्या अरुंद रस्त्यांवर वेगाच्या नादात पर्यटक अनेकदा गाडीवरील नियंत्रण गमावतात. अलीकडच्या काळात झालेल्या बहुतांश प्राणघातक अपघातांमध्ये पर्यटक मद्यधुंद अवस्थेत थार चालवत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. अशा मद्यधुंद वाहनचालकांना सहजासहजी जामीन मिळू नये, यासाठी सरकार कायद्यात कडक सुधारणा करत आहे. या संदर्भात हरियाणाचे माजी पोलीस महासंचालक ओ.पी. सिंग यांचे वक्तव्यही चर्चेत आले आहे, ज्यात त्यांनी म्हटले होते की, रस्त्यांवर स्टंट करणारे आणि हुल्लडबाज लोकच थार किंवा बुलेटची निवड करतात, कारण गाडीची निवड तुमची मानसिकता दर्शवते.
नियम मोडणाऱ्या रेंटल ऑपरेटर्सना 10,000 रुपयांचा दंड
– या मोहिमेअंतर्गत केवळ पर्यटकांवरच नाही, तर रेंटल कार ऑपरेटर्सच्या मनमानी कारभारावरही सरकार आता कडक चाप लावणार आहे.
– रेंटल कार कंपन्यांच्या पार्किंग स्पेस आणि गाड्यांच्या कागदपत्रांचे कडक ऑडिट केले जाईल.
– अनेक ऑपरेटर्स गाड्यांचा वेग मर्यादित ठेवणारे 'स्पीड गव्हर्नर' किंवा व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस मुद्दाम निष्क्रिय करतात. असे आढळल्यास संबंधित ऑपरेटर्सना 10,000 रुपयांचा अनिवार्य दंड ठोठावला जाईल.
– याशिवाय, खासगी म्हणजेच व्हाईट प्लेट असलेल्या गाड्या बेकायदेशीरपणे पर्यटकांना भाड्याने देणाऱ्यांवरही मोठी कारवाई केली जाणार आहे.
15 जुलैपासून हायटेक AI कॅमेऱ्यांचा 'ऑन द स्पॉट' दणका
गोव्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी सध्या 26 ठिकाणी अत्याधुनिक एआय (AI) ट्रॅफिक कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांनी केवळ चाचणी दरम्यानच एकाच दिवसात तब्बल 56,500 पेक्षा जास्त वाहतुकीचे नियमभंग पकडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या वाहनचालकांना केवळ समज दिली जात असली, तरी 15 जुलै 2026 पासून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना जागेवरच ऑटोमॅटिक ई-चालान पाठवले जातील. वाहतूक पोलिसांच्या नियोजनानुसार, डिसेंबर 2026 पर्यंत या अत्याधुनिक एआय कॅमेऱ्यांची संख्या वाढवून थेट 90 वर नेली जाणार आहे.
हेही वाचा – Sugar Price Hike: सणासुदीपूर्वीच साखर महागली; महिनाभरात किमती 6 ते 7 टक्क्यांनी वाढल्या