Most Powerful Women in India: भारतातील महिलांनी आज व्यवसाय, तंत्रज्ञान, राजकारण आणि समाजसेवा अशा सर्वच क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या नेतृत्वाचा आदर केवळ देशातच नव्हे, तर जागतिक स्तरावरही केला जातो. याच पार्श्वभूमीवर, 'फॉर्च्यून इंडिया'ने 2025 सालासाठी भारतातील सर्वात शक्तिशाली महिलांची (Most Powerful Women) यादी जाहीर केली आहे. या यादीत देशाच्या अर्थव्यवस्थेपासून ते कॉर्पोरेट जगतापर्यंत महत्त्वाचे निर्णय घेणाऱ्या प्रभावशाली महिलांचा समावेश आहे.
राजकारण आणि कॉर्पोरेट क्षेत्रात कोणाचे वर्चस्व?
या यादीत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पहिले स्थान पटकावले आहे. देशाच्या आर्थिक धोरणांची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या सीतारमण यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. दुसऱ्या क्रमांकावर रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी आहेत, ज्यांनी शिक्षण, क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. समाजसेवा आणि साहित्यातील कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सुधा मूर्ती यांना या यादीत 6 व्या स्थानावर स्थान मिळाले आहे.
जागतिक स्तरावर भारतीय कर्तृत्वाचा डंका
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) उपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ या यादीत 9 व्या क्रमांकावर असून, जागतिक आर्थिक धोरणांमध्ये त्यांची भूमिका कळीची ठरली आहे. रिलायन्स रिटेलचा चेहरा असलेल्या ईशा अंबानी यांनी 8 वे स्थान मिळवले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात 'HCLTech' च्या अध्यक्षा रोशनी नादर मल्होत्रा 4 थ्या क्रमांकावर आहेत, तर जागतिक लक्झरी ब्रँड 'चॅनेल'च्या सीईओ लीना नायर यांनी 16 वे स्थान पटकावले आहे.
मनोरंजन क्षेत्रातील 'पॉवरफुल' चेहरे
केवळ व्यवसाय आणि राजकारणच नव्हे, तर मनोरंजन विश्वातील महिलांनीही या यादीत आपली मोहोर उमटवली आहे. ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा जोनास, दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट या अभिनेत्रींचाही शक्तिशाली महिलांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
भारतातील सर्वात शक्तिशाली महिला
निर्मला सीतारमण – अर्थमंत्री
नीता अंबानी – रिलायन्स फाउंडेशन
रेड्डी सिस्टर्स – अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइझ
रोशनी नादर मल्होत्रा - एचसीएलटेक
बेला बजरिया – नेटफ्लिक्स
सुधा मूर्ती – राज्यसभा खासदार
सावित्री जिंदाल – हिसार (हरियाणा)
ईशा अंबानी – रिलायन्स रिटेल व्हेंचर्स
गीता गोपीनाथ – आयएमएफ