Warren Buffett Retirement : गुंतवणूक विश्वातील एक दैदीप्यमान पर्वाचा अखेर 31 डिसेंबर 2025 रोजी समारोप होणार आहे. जगातील सर्वात प्रभावशाली गुंतवणूकदार वॉरेन बफे हे 'बर्कशायर हैथवे'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावरून निवृत्त होत आहेत. तब्बल 6 दशके या कंपनीचे नेतृत्व केल्यानंतर ते आता ही धुरा ग्रेग एबल यांच्याकडे सोपवणार आहेत. 1 जानेवारी 2026 पासून ग्रेग एबल हे नवीन CEO म्हणून पदभार स्वीकारतील आणि आगामी भागधारकांच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवतील. बफे यांनी आपल्या साधेपणाने आणि अचूक निर्णयक्षमतेने संपूर्ण जगावर आपली वेगळी छाप सोडली आहे.
गुंतवणुकीची अनोखी शैली
वॉरेन बफे यांची गुंतवणूक करण्याची पद्धत अत्यंत साधी पण प्रभावी आहे. "चांगल्या कंपन्या ओळखा आणि संयम राखा," असा मोलाचा सल्ला त्यांनी जगभरातील गुंतवणूकदारांना दिला आहे. त्यांच्या मते, ज्या कंपन्यांचे मूल्य सध्या कमी आहे पण त्यांचे व्यवस्थापन मजबूत आहे, अशाच ठिकाणी पैसा गुंतवावा. एकदा गुंतवणूक केली की कंपनीच्या कामकाजात ढवळाढवळ न करता त्यांना त्यांचे काम करू देणे आणि व्यवसायाला वृद्धीसाठी पुरेसा वेळ देणे, हेच त्यांच्या यशाचे मुख्य सूत्र राहिले आहे.
यशाचा 'सक्सेस फॉर्म्युला'
बफे यांच्या मते, ज्या कामात तुम्हाला दररोज आनंद मिळतो, तेच काम आयुष्यात निवडावे. वयाच्या 13 व्या वर्षी वर्तमानपत्रे वाटण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज अब्जावधींच्या साम्राज्यापर्यंत पोहोचला असला, तरी त्यांच्या उत्साहात कधीही कमतरता आली नाही. यश किंवा पैसा मिळाल्यानंतरच आनंद मिळेल, हा विचार पूर्णतः चुकीचा असल्याचे ते मानतात. जे काम आपण आज करत आहोत, त्या प्रक्रियेतच खरा आनंद शोधला पाहिजे, असे त्यांचे ठाम मत आहे.
दानशूरता आणि मानवी मूल्ये
केवळ संपत्ती गोळा करणे म्हणजे यश नव्हे, हे वॉरेन बफे यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांनी आपल्या कंपनीचे सुमारे 1.3 अब्ज डॉलर्सचे शेअर्स विविध सेवाभावी संस्थांना दान केले आहेत. पैसा आणि सत्ता ही यशाची खरी मोजमापे नसून, दयाळूपणा ही जगातील सर्वात अनमोल गोष्ट आहे, असे ते नेहमी सांगतात. दयाळूपणा विनामूल्य असला तरी त्याचे मूल्य कोणत्याही संपत्तीपेक्षा श्रेष्ठ आहे, हा संदेश त्यांनी आपल्या वारशातून जगाला दिला आहे.