Sadetin Shakti Peeh : ही आहेत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठं; जाणून घेऊया त्यांच्या जन्माची कथा

शारदीय नवरात्रीत या साडेतीन शक्तीपीठांवर देवीचा उत्सव आणि जागर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ही सर्व जागृत देवस्थाने आहेत.

Sadetin Shakti Peeh : ही आहेत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठं; जाणून घेऊया त्यांच्या जन्माची कथा

Shardiya Navratri 2025 : नवरात्रीचा पवित्र उत्सव सुरू आहे. या नऊ दिवसांमध्ये आदिमाया शक्ती भगवतीच्या विविध रूपांची आराधना केली जाते. देशभरात देवीची 51 शक्तीपीठं आहेत, त्यापैकी महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तीपीठं आहेत. ही चार तीर्थक्षेत्रे म्हणजे तुळजापूर, कोल्हापूर, माहूरगड आणि सप्तश्रृंगी वणी. या प्रत्येक पीठाची उत्पत्ती आणि त्यामागील कथा खूपच रंजक आहे.

1. कोल्हापूरची महालक्ष्मी (करवीर निवासिनी अंबाबाई)
कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या पीठाच्या उत्पत्तीमागे एक पौराणिक कथा आहे. पूर्वी ब्रह्मदेवाचा मानसपुत्र कोल्हासूर आणि त्याचा मुलगा करवीर यांनी लोकांना खूप त्रास दिला. जेव्हा शंकराने करवीराचा वध केला, तेव्हा चिडलेल्या कोल्हासूराने सर्वत्र दहशत निर्माण केली.
लोकांनी जगदंबेचा धावा करताच देवीने त्वरित प्रकट होऊन कोल्हासूराचा वध केला. मरण्यापूर्वी कोल्हासूराने देवीकडे वरदान मागितले की, 'माझे नाव आणि माझ्या मुलाचे नाव तुमच्या नावामागे जोडले जावे.' देवीने ते मान्य केले. म्हणूनच देवी 'करवीर निवासिनी कोल्हापूरची महालक्ष्मी' या नावाने प्रसिद्ध झाली.

2. तुळजापूरची तुळजाभवानी माता
तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. या पीठामागील कथा अशी आहे की, मंदाकिनी नदीकाठी 'अनुभूती' तप करत असताना कुक्कर राक्षसाने तिच्यावर हल्ला केला. अनुभूतीने तात्काळ जगदंबेला हाक मारली. भक्ताच्या हाकेला प्रतिसाद देत देवी तिथे त्वरित प्रकट झाली आणि तिने त्या राक्षसाला ठार मारले. देवी त्वरित प्रकट झाली, म्हणून तिला 'त्वरीता' हे नाव मिळाले. पुढे याच नावाचा अपभ्रंश होऊन ते 'तुरजा' आणि नंतर 'तुळजा' झाले.

हेही वाचा – Navratri 2025: नवरात्रीत दक्षिणेश्वर काली मंदिराला भेट दिल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, जाणून घ्या मंदिराचा इतिहास

3. माहूरगडची रेणुकादेवी
माहूरगड हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. या पीठाची कथा जमदग्नी ऋषींची पत्नी रेणुका आणि त्यांचा पुत्र भगवान परशुराम यांच्याशी जोडलेली आहे. कार्तवीर्य राजाने जमदग्नींकडे कामधेनूची मागणी केली, पण त्यांनी नकार दिल्यावर राजाने जमदग्नींचा वध केला. या घटनेने संतप्त झालेल्या परशुरामांनी 21 वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केल्याचे सांगितले जाते.
परशुराम आई (रेणुका) आणि वडिलांचा मृतदेह घेऊन माहूरगड येथे आले. तेव्हा त्यांना 'तू येथेच थांब' अशी आकाशवाणी झाली. त्यांनी वडिलांच्या चितेला अग्नी दिला, पण त्यावेळी माता रेणुकानेही त्या चितेत उडी घेतली. त्यांनी परशुरामाला 'एक महिन्याने परत ये' असे सांगितले. आईच्या आठवणीने व्याकूळ झालेले परशुराम वेळेपूर्वीच परत आले, तेव्हा माता रेणुका कमरेपर्यंत चितेतून बाहेर आल्या. हीच माहूरगडची रेणुकादेवी होय. याच ठिकाणी भगवान दत्तात्रयांचे निद्रास्थान देखील आहे.

4. सप्तश्रृंगी वणी
वणीची सप्तश्रृंगी देवी ही अठरा हातांची असून, तिची मूर्ती 8 फूट उंच आहे. ही देवी एका डोंगरावर विराजमान आहे. याच पर्वतावर देवीने महिषासुराचा वध केला आणि नंतर तेथेच वास्तव्य केले. हा परिसर सात शिखरांचा (श्रृंगांचा) असल्याने याला 'सप्तश्रृंगी' असे नाव मिळाले. या डोंगराचे महत्त्व इतके आहे की, द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना हनुमानाचे सात तुकडे याच पर्वतावर पडले, असे मानले जाते. या देवीने दुल्लभसेठ नावाच्या गुजराथी व्यापाऱ्यासाठी पुण्यात चतुःश्रृंगी येथेही वास केला आहे.

शारदीय नवरात्रीत या साडेतीन शक्तीपीठांवर देवीचा उत्सव आणि जागर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

हेही वाचा – Navratri 2025 : श्रद्धा, शुद्धी, आरोग्याचा त्रिवेणी संगम; ही आहेत नवरात्रीत अनवाणी चालण्यामागे धार्मिक, वैज्ञानिक कारणे

(Disclaimer : ही बातमी उपलब्ध सामान्य माहितीवर आणि धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. जय महाराष्ट्र यातून कोणताही दावा करत नाही.)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number