Passport Walk-In Facility: पासपोर्टसाठी आता ताटकळत राहण्याची गरज नाही! 45 दिवसांपेक्षा जास्त वेळ लागल्यास थेट ‘वॉक-इन’ प्रवेशाची सुविधा

पासपोर्ट काढण्याच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे आणि लागणाऱ्या वेळामुळे अनेक जण कंटाळून जातात. नागरिकांची हीच अडचण लक्षात घेऊन यावर एक तोडगा काढण्यात आला आहे.

Passport Walk-In Facility: पासपोर्टसाठी आता ताटकळत राहण्याची गरज नाही! 45 दिवसांपेक्षा जास्त वेळ लागल्यास थेट ‘वॉक-इन’ प्रवेशाची सुविधा

Passport Walk-In Facility : अनेक नागरिकांना परदेशवारी करण्याची तीव्र इच्छा असते, परंतु पासपोर्ट काढण्याच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे आणि लागणाऱ्या वेळामुळे अनेक जण कंटाळून जातात. नागरिकांची हीच अडचण लक्षात घेऊन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रादेशिक पारपत्र कार्यालयाने (RPO) एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक तोडगा काढला आहे. नवीन नियमानुसार, 2 जुलै 2026 पासून ज्या अर्जदारांचे पासपोर्ट किंवा पीसीसी (PCC) अर्ज सबमिट केल्याच्या तारखेपासून 45 दिवसांपेक्षा जास्त काळापासून प्रलंबित आहेत, त्यांना कोणत्याही पूर्व किंवा ऑनलाइन अपॉइंटमेंटशिवाय थेट मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC), वांद्रे (पूर्व) येथील 'विदेश भवन' कार्यालयात प्रवेश दिला जाईल. बुधवार वगळता इतर सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी 9 ते 11 या वेळेत ही 'वॉक-इन' सुविधा उपलब्ध असेल. ज्यांनी आधीच नंतरच्या तारखेची अपॉइंटमेंट घेतली आहे, परंतु अर्ज 45 दिवसांपेक्षा जुना आहे, ते देखील या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

या श्रेणीतील नागरिकांना अर्जाच्या तारखेची अट नाही
काही विशिष्ट श्रेणींमधील अर्जदारांसाठी अर्जाच्या तारखेचा किंवा दिवसांचा विचार न करता थेट 'वॉक-इन' (पूर्व-नियोजनाशिवाय उपस्थित राहणे) प्रवेशाची विशेष सवलत देण्यात आली आहे:
– राजनैतिक (Diplomatic) आणि अधिकृत (Official) पासपोर्टधारक.
– वितरित न होता पोस्टाकडून परत आलेला पासपोर्ट किंवा PCC पुन्हा पाठवण्याची विनंती असलेले अर्ज.
– परदेशी नागरिकत्व स्वीकारल्यानंतर भारतीय पासपोर्ट जमा (Surrender) करणारे नागरिक.
– प्रलंबित असलेले पासपोर्ट अर्ज कायमचे बंद करण्याची विनंती करणारे अर्जदार.

पासपोर्ट हरवल्यास किंवा खराब झाल्यास काय करावे?
जर तुमचा पासपोर्ट परदेशात प्रवासादरम्यान हरवला, तर अजिबात घाबरून न जाता सर्वात आधी स्थानिक पोलीस ठाण्यात आणि तिथल्या भारतीय दूतावासाकडे (Indian Embassy) तातडीने रीतसर तक्रार नोंदवावी. लक्षात ठेवा, पासपोर्ट खराब झाल्यास किंवा हरवल्यास पासपोर्ट कार्यालय तुम्हाला जुन्या पासपोर्टची दुसरी प्रत (डुप्लिकेट) देत नाही. अशा वेळी तुम्हाला नवीन क्रमांकासह आणि नवीन वैधतेसह फ्रेश पासपोर्ट 'पुन्हा जारी' (Re-issue) करून दिला जातो. पासपोर्ट पुन्हा मिळवण्यासाठी तुमच्याकडे सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे असणे अनिवार्य आहे, जी तुम्हाला अर्जासोबत जोडावी लागतील.

हेही वाचा – Indian Citizenship Rules: पासपोर्ट, आधार किंवा पॅन कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही; मग भारतीय नागरिक असण्याचा खरा पुरावा काय? जाणून घ्या नियम

नवीन पासपोर्ट मिळवण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
– एफआयआर (FIR): सर्वात आधी जुन्या पासपोर्टची प्रत घेऊन जवळच्या पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवा.
– अपॉइंटमेंट: पोलीस ठाण्यात न गेल्यास जवळच्या प्रादेशिक पारपत्र कार्यालयात (RPO) थेट अपॉइंटमेंट बुक करा.
– कागदपत्रे: पडताळणीसाठी तुमच्याकडे स्थानिक रहिवासी पुरावा, ओळखीचा पुरावा आणि जन्म प्रमाणपत्र यांसारखी आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
– ऑनलाइन नोंदणी: अर्जदार अधिकृत पारपत्र सेवा संकेतस्थळावर (Passport Seva Website) जाऊन ऑनलाइन नोंदणी करू शकतात.
– तत्काळ पर्याय: लवकरात लवकर पासपोर्ट हवा असल्यास तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड आयडीने लॉग इन करून 'तत्काळ' (Tatkaal) हा पर्याय निवडू शकता.
– पेमेंट: तुमच्या सोयीनुसार पेमेंट करा आणि अपॉइंटमेंटची तारीख निश्चित करा. पासपोर्ट हरवल्यानंतर तो पुन्हा मिळवण्यासाठी शासनाकडून प्रोसेसिंग फी आकारली जाते.

नियमित प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक
पासपोर्ट हरवणे किंवा खराब होणे ही अत्यंत संवेदनशील बाब असल्याने नवीन पासपोर्ट मिळवण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमित आणि कायदेशीर प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्रांची अचूक पडताळणी झाल्यानंतरच नवीन नियमांनुसार पासपोर्ट जारी केला जातो. आरपीओ मुंबईने सुरू केलेल्या या नवीन वॉक-इन सुविधेमुळे रखडलेल्या अर्जांचा निपटारा वेगाने होईल आणि नागरिकांना पासपोर्ट कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज उरणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा – Passport : पासपोर्ट हा नागरिकत्वाचा पुरावा नव्हे, केवळ प्रवासासाठीचा दस्तऐवज; परराष्ट्र मंत्रालयाने केले स्पष्ट

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number