LPG ATM : देशात सध्या सुरू असलेल्या एलपीजी (LPG) पुरवठा संकटामध्ये नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ग्राहकांच्या सुविधेसाठी देशातील पहिले 'एलपीजी एटीएम' (LPG ATM) सुरू करण्यात आले आहे. भारत गॅसचा (BPCL) हा एक पायलट प्रोजेक्ट असून, यामुळे ग्राहकांना आता चोवीस तास गॅस सिलिंडर मिळणे सोपे झाले आहे. गुरुग्राममधील सोहना सेक्टर-33 मधील सेंट्रल पार्क फ्लॉवर व्हॅली येथे ही सुविधा मिळत आहे.
रिकामी टाकी द्या आणि भरलेला सिलिंडर न्या
हे 'गॅस एटीएम' पूर्णपणे स्वयंचलित (Automatic) आणि संपर्करहित (Contactless) तंत्रज्ञानावर आधारित आहे. ग्राहकांना गॅस एजन्सीच्या फेऱ्या मारण्याची किंवा डिलिव्हरी मिळण्याची वाट पाहण्याची आता गरज उरणार नाही. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करावी लागते:
– मोबाईल नंबर: मशीनवर आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर नोंदवावा लागतो.
– OTP पडताळणी: सुरक्षेसाठी मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करावा लागतो.
– पेमेंट: QR कोड स्कॅन करून UPI किंवा डेबिट कार्डद्वारे पैसे भरावे लागतात.
– सिलिंडर अदलाबदल: पेमेंट यशस्वी झाल्यानंतर, ग्राहक आपली रिकामी टाकी मशीनमध्ये ठेवून भरलेला नवीन सिलिंडर घेऊ शकतात.
हलक्या वजनाचे आणि पारदर्शक कॉम्पोजिट सिलिंडर
या एटीएमची खास वैशिष्ट्ये म्हणजे येथे उपलब्ध असलेले 'कॉम्पोजिट सिलिंडर'. पारंपारिक लोखंडी सिलिंडरचे वजन सुमारे 30 किलोग्रॅम असते, जे वाहून नेणे कठीण असते. मात्र, या मशीनमध्ये मिळणारे नवीन फायबर सिलिंडर केवळ 15 किलोग्रॅम वजनाचे आहेत. या सिलिंडरची बॉडी पारदर्शक असल्याने ग्राहकांना आत असलेल्या गॅसची पातळी सहज पाहता येते. एका वेळी या एटीएममध्ये 10 सिलिंडर ठेवता येतात. जेव्हा साठा कमी होऊन फक्त 2 सिलिंडर उरतात, तेव्हा यंत्रणा आपोआप गॅस एजन्सीला रिफिलिंगसाठी सूचित करते.
पुरवठा साखळीतील संकट आणि 'होर्मुज'चा अडथळा
भारताला आपल्या गरजेचा सुमारे 60 टक्के एलपीजी आयात करावा लागतो. या आयातीचा 85 ते 95 टक्के हिस्सा 'होर्मुजच्या सामुद्रधुनीतून' (Strait of Hormuz) येतो. मात्र, अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे हा सागरी मार्ग सध्या बंद झाला आहे. यामुळे भारतातील शहरांमध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून सरकारने घरगुती पुरवठ्याला प्राधान्य दिले आहे. याचा मोठा फटका हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि केटरर्ससारख्या व्यावसायिक क्षेत्राला बसला आहे.
भविष्यातील विस्तार आणि उपलब्धता
गुरुग्राममधील हा प्रयोग यशस्वी झाल्यास, देशातील इतर मोठ्या शहरांमध्येही अशा प्रकारचे 'एलपीजी एटीएम' बसवले जातील. सध्या ही सेवा 24×7 उपलब्ध आहे. जरी नागरिक अजून या सुविधेबद्दल पूर्णपणे परिचित नसले तरी, येत्या काळात ज्यांना रांगेत उभे राहावे लागते किंवा नोंदणी केल्यावर लवकर नंबर येत नाही, अशा लोकांसाठी एटीएममधून गॅस घेणे अधिक सोयीचे ठरेल. विशेषतः महानगरांमध्ये राहणाऱ्या नोकरदार वर्गासाठी हे वरदान ठरू शकते. कारण अनेकदा सिलिंडर डिलिव्हरीच्या वेळी हे लोक घरी नसतात. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.