Kakinada Firecracker Factory Blast: आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातील समलकोट मंडल अंतर्गत येणाऱ्या वेतलापलेम येथील एका फटाका कारखान्यात शनिवारी दुपारी भीषण स्फोट झाला. या हृदयद्रावक दुर्घटनेत आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला असून, अन्य 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोट झाला तेव्हा कारखान्यात 20 हून अधिक कामगार उपस्थित होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
स्फोटाची भीषणता आणि बचावकार्य
हा स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज काही किलोमीटरपर्यंत ऐकू आला. कामगार मोठ्या प्रमाणात फटाके बनवण्याच्या कामात मग्न असताना अचानक हा स्फोट झाला आणि क्षणार्धात संपूर्ण कारखान्याला आगीने वेढले. या आगीत अनेक लोक अडकले आणि गंभीरपणे भाजले गेले. स्फोटामुळे मृतदेहांचे अक्षरशः तुकडे झाले असून जवळच्या काही इमारतींचेही मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक रहिवाशांच्या मदतीने बचावकार्य राबवून जखमींना तातडीने रुग्णवाहिकेने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
Kakinada, Andhra Pradesh | 18 people have died after a fire broke out in a firecracker manufacturing unit in Vetlapalem, Kakinada district. The condition of several injured persons is reported to be critical: Sagili Shan Mohan, Collector & District Magistrate — ANI (@ANI) February 28, 2026
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केला शोक
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बाधित लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री नायडू यांनी म्हटलं आहे की, “आम्ही मदत कार्य आणि उपाययोजनांवर स्वतः लक्ष ठेवून आहोत. या कठीण प्रसंगी सरकार शोकाकुल कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.” जखमींना सर्वोत्तम उपचार देण्याच्या सूचनाही त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत.