Jio IPO Update: रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या 49 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) एका ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली आहे. मुकेश अंबानी यांच्या मालकीची 'जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड' (JPL) आता शेअर बाजारात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली असून, कंपनीच्या संचालक मंडळाने 'ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस'ला (DRHP) मंजुरी दिली आहे. हे प्रॉस्पेक्टस आजच बाजार नियामक संस्था 'सेबी'कडे (SEBI) सादर केले जात आहे. या खास प्रसंगी अंबानी यांनी जिओची नवी दूरदृष्टी मांडताना सांगितले की, आतापर्यंत कंपनीने देशाच्या कानाकोपऱ्याला जमिनीवरील ऑप्टिकल फायबर आणि मोबाईल टॉवर्सद्वारे जोडले आहे; परंतु आता जिओचे उद्दिष्ट उपग्रह (सॅटेलाइट) आणि हवाई नेटवर्कच्या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांना हाय-स्पीड इंटरनेटचा अभूतपूर्व अनुभव देणे हे आहे.
आयपीओच्या माध्यमातून 27 कोटी नवीन शेअर्स बाजारात येणार
स्टॉक एक्सचेंजला देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, या मेगा आयपीओच्या अंतर्गत जिओ 27 कोटी (270 दशलक्ष) नवीन इक्विटी शेअर्स बाजारात आणणार आहे. या प्रत्येक शेअरचे दर्शनी मूल्य (Face Value) 10 रुपये ठेवण्यात आले असून, शेअरची अंतिम किंमत 'बुक-बिल्डिंग' प्रक्रियेद्वारे ठरवली जाईल. जिओची शेअर बाजारातील ही नोंदणी (Listing) जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान कंपन्या उभारण्यात आणि त्याद्वारे अफाट मूल्य निर्माण करण्यात भारत पूर्णपणे सक्षम आहे, हे जगाला दाखवून देईल, असा विश्वास मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला.
जागतिक स्तरावर जिओचा नवा मैलाचा दगड
जिओने ग्राहकांच्या संख्येत 52.4 कोटींचा (524 दशलक्ष) टप्पा ओलांडून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यातील तब्बल 26.8 कोटींपेक्षा जास्त ग्राहक जिओचे 5G नेटवर्क वापरत आहेत. चीनचा अपवाद वगळता, एकाच देशात चालणारे हे जगातील सर्वात मोठे 5G नेटवर्क बनले आहे. नेटवर्कवरील एकूण डेटा ट्रॅफिकमध्ये वार्षिक 30.8 टक्केची अफाट वाढ झाली असून ते आता 241 एक्साबाइट्सवर पोहोचले आहे. याच धर्तीवर, 'जिओ एअरफायबर'ने (Jio AirFiber) बाजारात गेम-चेंजर ठरत अवघ्या काही दिवसांतच देशातील 1.3 कोटी (13 दशलक्ष) घरांना फिक्स्ड वायरलेस ब्रॉडबँडशी जोडले आहे. या यशासह जिओ आता जगातील सर्वात मोठी फिक्स्ड वायरलेस ब्रॉडबँड ऑपरेटर कंपनी ठरली आहे.