Jay Bhanushali Mahhi Vij Divorce : टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. टीव्हीवरील सर्वांत लोकप्रिय आणि पॉवरफुल जोडप्यांपैकी एक मानले जाणारे जय भानुशाली आणि माही विज यांचा घटस्फोट झाला आहे. लग्नाच्या तब्बल 14 वर्षांनंतर हे दोघे विभक्त झाले असून, त्यांनी अधिकृतरीत्या घटस्फोटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्याचे कळते आहे. गेल्या काही वर्षांपासून या दोघांच्या नात्यात समस्या सुरू होत्या. त्यांनी हे नाते वाचवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. परंतु, त्यात यश आले नाही आणि अखेर त्यांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वीच त्यांनी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता आणि तेव्हापासून दोघे वेगवेगळे राहत होते.
जय-माहीचे वैयक्तिक आयुष्य आणि करिअर
40 वर्षीय जय भानुशाली हा टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेता आणि लोकप्रिय सूत्रसंचालक आहे. तर 43 वर्षीय माही विज ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने ‘लागी तुझसे लगन’ आणि ‘लाल इश्क’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारून लोकप्रियता मिळवली. या दोघांनी 2011 मध्ये विवाह केला होता. त्यांच्या घटस्फोटाची चर्चा याआधी जुलै महिन्यातही झाली होती.
तीन मुलांचे संगोपन
लग्नाच्या सहा वर्षांनंतर, 2017 मध्ये जय आणि माहीने दोन मुलांना दत्तक घेतले होते. त्यांच्या मुलाचे नाव राजवीर आणि मुलीचे नाव खुशी आहे. त्यानंतर दोन वर्षांनी, 2019 मध्ये माहीने IVF (इन-विट्रो फर्टिलायझेशन) च्या माध्यमातून त्यांची मुलगी ताराला जन्म दिला. या घटस्फोटानंतर, दोघे मिळून त्यांच्या तीन मुलांचे संगोपन करणार असल्याचे कळते आहे. त्यांची मुलगी तारा सध्या सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. ती लहान वयातच इन्फ्लुएन्सर बनली असून, तिच्या इन्स्टाग्राम पेजला दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींमध्येही ताराची लोकप्रियता आहे.
नात्यातील समस्यांची सुरुवात
जय भानुशाली आणि माही विज यांच्या नात्यात 2014 मध्येच फूट पडल्याचे म्हटले जाते. त्यावेळी जयचा ‘हेट स्टोरी 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याने अभिनेत्री सुरवीन चावलासोबत इंटिमेट सीन्स दिले होते, ज्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचे बोलले जात होते. मात्र, त्या वेळी दोघांनीही हे वृत्त फेटाळले होते.