ITI Sector Investment India: देशातील 3,000 हून अधिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थांकडे (ITI) आता केवळ 'शेवटचा पर्याय' म्हणून पाहिले जाणार नाही. या क्षेत्राचे चित्र बदलण्यासाठी केंद्र सरकारने 60 हजार कोटी रुपयांची भव्य योजना आखली आहे. पुण्यात आयोजित 'विमेन लिडिंग द फ्यूचर ऑफ वर्क' या परिषदेत बोलताना केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी ही माहिती दिली. खासगी संस्था आणि उद्योगांनी आयटीआय संस्थांना दत्तक घेऊन किंवा सहकार्य करून त्यांना आधुनिक तंत्रज्ञानासह सक्षम करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
'स्टेम' क्षेत्रात महिलांची मोठी भरारी
भारतातील तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्रात महिलांचा सहभाग झपाट्याने वाढत असल्याचे चौधरी यांनी नमूद केले. सध्याच्या आकडेवारीनुसार,
विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) क्षेत्रातील पदवीधरांमध्ये तब्बल 43 टक्के महिला आहेत, जे जागतिक स्तरावर एक मोठे प्रमाण आहे.
याशिवाय गेल्या 3 वर्षांत 'स्टेम' अभ्यासक्रमांमध्ये मुलींच्या नोंदणीचे प्रमाण 10 टक्क्यांवरून 16 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
महिलांच्या नेतृत्वाखालील कंपन्यांची प्लेसमेंट 46 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
'स्टार्टअप इंडिया' अंतर्गत नोंदणीकृत 2.23 लाख नवउद्यमींपैकी सुमारे एक तृतीयांश महिला आहेत.
सिम्बायोसिसमध्ये 'युनेस्को चेअर'चे उद्घाटन
पुण्यातील सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठाला 'जेंडर इन्क्युजन अँड स्कील डेव्हलपमेंट' या विषयासाठी 'युनेस्को चेअर' प्रदान करण्यात आली असून तिचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. या माध्यमातून महिलांसाठी दर्जेदार शिक्षण, शिक्षकांची क्षमतावृद्धी आणि कौशल्य परिसंस्थेचा विकास करण्यावर भर दिला जाणार आहे. विद्यापीठाच्या प्र कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार यांनी सांगितले की, कुशल महिलांच्या माध्यमातून सक्षम समाज आणि प्रगत देश घडवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
हेही वाचा – EPFO New Rule: 1 मे पासून EPFO पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल; UPI द्वारे खात्यात जमा होणार निधी
राज्यातील महिला आर्थिक विकासावर भर
राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महाराष्ट्रातील महिलांच्या प्रगतीचा आढावा घेतला. महिलांना केवळ मदत करण्याऐवजी त्यांना अर्थव्यवस्थेत सक्रिय करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून २० लाखांहून अधिक महिला स्वमदत गटांशी जोडल्या गेल्या आहेत. ग्रामीण भागात महिलांच्या कौशल्य विकासासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जात असून, यामुळे महिला स्वतःचे व्यवसाय यशस्वीपणे चालवत आहेत.
तरुणांना 'जैसे थे' स्थिती बदलण्याचे आवाहन
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी जयंत चौधरी यांनी तरुण विद्यार्थ्यांना एक मोलाचा सल्ला दिला. आपली व्यवस्था अनेकदा परिस्थिती 'जैसे थे' ठेवण्याचा प्रयत्न करते, ही प्रवृत्ती बदलणे गरजेचे आहे. तरुणांनी चुकीच्या गोष्टींना स्वीकारण्याऐवजी प्रश्न विचारले पाहिजेत आणि प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान दिले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. या परिषदेला युनेस्कोचे प्रतिनिधी जिआन शी तेंग आणि नॉर्वेच्या महावाणिज्यदूत मोनिका नेगेलगार्ड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.