Ranveer Singh FWICE Ban Lifted: बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) यांच्यात सुरू असलेला वाद अखेर मिटला आहे. ‘डॉन 3’ या बहुप्रतीक्षित चित्रपटातून ऐनवेळी माघार घेतल्याप्रकरणी रणवीर सिंहविरोधात जारी करण्यात आलेला असहकाराचा आदेश FWICE ने अधिकृतपणे मागे घेतला आहे. चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होण्यास अवघ्या 3 आठवडे शिल्लक असताना रणवीरने प्रकल्प सोडल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर दिग्दर्शक-निर्माता फरहान अख्तर यांनी फेडरेशनकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात झालेल्या बैठकींना रणवीर अनुपस्थित राहिल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती.
तीन प्रमुख संघटनांच्या हस्तक्षेपाने वाद मिटला
रणवीर सिंहवरील बंदी हटवण्यासाठी इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशन (IMPAA), प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडिया आणि सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन (CINTAA) या चित्रपटसृष्टीतील तीन प्रमुख संघटनांनी पुढाकार घेतला. या संघटनांच्या विनंतीनंतर सर्व संबंधित पक्षांमध्ये चर्चा झाली आणि अखेर हा वाद सामोपचाराने मिटवण्यात आला.
‘यात कोणाचाही विजय किंवा पराभव नाही’
FWICE चे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी पत्रकार परिषदेत निर्णय जाहीर करताना सांगितले की, “IMPAA, प्रोड्यूसर्स गिल्ड आणि CINTAA यांच्या आग्रहाखातर आम्ही असहकाराचा आदेश तात्काळ मागे घेत आहोत. भविष्यात अशा प्रकारचे वाद निर्माण झाल्यास निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकार यांनी एकत्रितपणे चर्चा करून मार्ग काढावा, अशी भूमिका घेण्यात आली आहे.” रणवीर सिंहने फेडरेशनला पाठवलेल्या कायदेशीर नोटिशीबाबत बोलताना तिवारी म्हणाले की, “या प्रकरणात कोणाचाही विजय किंवा पराभव झालेला नाही. आमचा कायदेशीर विभाग त्या नोटिशीला नियमानुसार उत्तर देईल.”
कलाकारांच्या माघारीबाबत निर्मात्यांची चिंता
दरम्यान, प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियाने या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कलाकारांच्या शेवटच्या क्षणी घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर चिंता व्यक्त केली आहे. गिल्डने जारी केलेल्या पत्रात थेट नावे न घेता एक्सेल एंटरटेनमेंट आणि पॅनोरमा स्टुडिओज यांच्या तक्रारींचा उल्लेख केला आहे. हा संदर्भ रणवीर सिंहच्या ‘डॉन 3’ आणि अक्षय खन्नाच्या ‘दृश्यम 3’ मधून बाहेर पडण्याशी जोडला जात आहे.
अचानक माघारीमुळे उद्योगाला फटका
गिल्डच्या मते, मुख्य चित्रीकरण सुरू होण्याच्या काही दिवस आधी कलाकार किंवा तंत्रज्ञांनी प्रकल्प सोडल्यास निर्मात्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. याशिवाय चित्रपटाशी संबंधित इतर विभागांचे कामही प्रभावित होते आणि शेकडो तंत्रज्ञ व कामगारांच्या रोजगारावर परिणाम होतो. अशा घटनांमुळे चित्रपटसृष्टीतील व्यावसायिकता, विश्वास आणि परस्पर सहकार्यालाही धक्का बसतो.
सामोपचाराने वाद मिटवण्याचे आवाहन
या प्रकरणाचा शेवट सकारात्मक पद्धतीने झाल्याचे मानले जात असले तरी, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कलाकार, निर्माते आणि संघटनांनी अधिक जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. मतभेद संवादातून सोडवून संपूर्ण चित्रपटसृष्टीचे हित जपावे, असे आवाहनही प्रोड्यूसर्स गिल्डकडून करण्यात आले आहे.