US Iran Conflict: अमेरिका आणि इराणमधील तणाव आता अत्यंत गंभीर वळणावर पोहोचला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराणच्या 3 जहाजांवर झालेल्या हल्ल्यांचे तीव्र पडसाद जागतिक स्तरावर उमटत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्की येथे झालेल्या नाटो (NATO) शिखर परिषदेत इराणसोबतचा करार पूर्णपणे संपला असल्याचे जाहीर केले. ट्रम्प यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत इराणचा उल्लेख 'खोटारडे आणि वेडे' असा करत, त्यांच्याकडे अणुशस्त्रे जाणे धोक्याचे असल्याचे म्हटले. तसेच इराणसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा करणे म्हणजे निव्वळ वेळेचा अपव्यय असल्याचे सांगत त्यांनी शांतता वाटाघाटींचे दरवाजे बंद केले आहेत.
अमेरिकेला लष्करी मदत देणारे देश इराणच्या रडारवर
ट्रम्प यांच्या या भूमिकेनंतर इराणच्या 'खातम अल-अंबिया' या मध्यवर्ती लष्करी मुख्यालयाने अमेरिकेसह तिच्या मित्रराष्ट्रांना गंभीर इशारा दिला आहे. इराणच्या सार्वभौमत्वाला धक्का लावण्यासाठी जर कोणत्याही देशाने अमेरिकन लष्कराला आपली जमीन किंवा कोणतीही मदत दिली, तर इराणचे सैन्य त्या देशाला आणि मदतीच्या स्रोताला आपले 'कायदेशीर लक्ष्य' (legitimate target) मानून थेट लष्करी कारवाई करेल. इराणच्या 'तस्निम' वृत्तसंस्थेने लष्कराच्या हवाल्याने स्पष्ट केले आहे की, अमेरिकेला सहकार्य करणाऱ्या प्रत्येक देशाला याचे अतिशय गंभीर परिणाम भोगावे लागतील.
होर्मुझवरील नवीन व्यवस्था अमेरिकेने मान्य करावी; इराणचा आक्रमक पवित्रा
अमेरिकेने केलेल्या नव्या लष्करी हल्ल्यानंतर तेहरानने जशास तसे उत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे. इराणच्या संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख इब्राहिम अझीझी यांनी 'X' वर पोस्ट करत अमेरिकेला इशारा दिला आहे की, वॉशिंग्टनला कोणत्याही परिस्थितीत होर्मुझमधील इराणची नवीन सुरक्षा व्यवस्था मान्य करावीच लागेल. 'रिव्होल्युशनरी गार्ड्स'ने अमेरिकेला दिलेले प्रत्युत्तर हा केवळ एक 'प्राथमिक इशारा' असल्याचे सांगत इराणने या सागरी मार्गावर आपला पूर्ण अधिकार असल्याचा पुनरुच्चार केला आहे.
अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात खुझेस्तान प्रांतात हानी; 1 व्यक्तीचा मृत्यू, 2 जखमी
दरम्यान, अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी रात्रीच्या सुमारास इराणच्या खुझेस्तान प्रांतात जोरदार बॉम्बफेक केली. या हल्ल्यांमध्ये 1 नागरिकाचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. तस्निम वृत्तसंस्थेनुसार, नैऋत्य इराणमधील माहशहर, इमाम खोमेनी बंदर आणि हमिदिया या प्रमुख शहरांमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना अमेरिकेने लक्ष्य केले असून, या कारवाईमुळे मध्यपूर्वेत आता मोठ्या युद्धाचा भडका उडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.