Iran Israel War 2026: इराणमधून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता. याच भीषण हल्ल्यात खामेनी यांच्या पत्नी मन्सूरेह खोजस्तेह बागेरजादेह या देखील गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते, मात्र उपचारांना यश आले नाही. इराणच्या 'तस्निम' वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मन्सूरेह बागेरजादेह यांचे निधन झाले असून, खामेनी परिवारावर कोसळलेले हे दुसरे मोठे संकट आहे.
हल्ल्यावेळी खामेनींसोबत संपूर्ण कुटुंब उपस्थित; 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मन्सूरेह खोजस्तेह बागेरजादेह या 79 वर्षांच्या होत्या. त्यांचा जन्म इराणमधील मशहाद येथे झाला होता आणि त्या 'आयआरआयबी' (IRIB) चे माजी उपसंचालक हसन खोजस्तेह बागेरजादेह यांच्या भगिनी होत्या. ज्या दिवशी अमेरिका आणि इस्रायलने तेहरानमधील खामेनींच्या सुरक्षित कंपाऊंडवर हल्ला केला, त्या वेळी मन्सूरेह या खमेनींच्या सोबतच उपस्थित होत्या. याच हल्ल्यात खामेनी यांच्यासह त्यांची मुलगी आणि जावई यांचाही जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण आखाती प्रदेशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून इराणने आता अनेक शेजारील देशांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे.
अमेरिका-इस्रायलचा संयुक्त 'सर्जिकल स्ट्राईक'; ट्रम्प यांचा इराणला इशारा
शनिवारी अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील अनेक संवेदनशील भागांवर क्षेपणास्त्रे डागली, ज्यात सर्वोच्च नेत्याच्या कार्यालयाचाही समावेश होता. या कारवाईनंतर मध्यपूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याचे समर्थन करताना म्हटले आहे की, "इराण आपला अणू कार्यक्रम वेगवान करत असून अमेरिकेला लक्ष्य करू शकतील अशी क्षेपणास्त्रे विकसित करत आहे, जे जगासाठी धोकादायक आहे." एका विशेष व्हिडिओ संदेशाद्वारे ट्रम्प यांनी इराणी जनतेला आवाहन केले आहे की, त्यांनी खामेनी राजवटीविरुद्ध उभे राहावे आणि स्वतःचे लोकशाही सरकार स्थापन करावे.