Iran-Israel War Impact on Stock Market: मध्यपूर्वेतील वाढत्या लष्करी तणावाचा थेट परिणाम जागतिक बाजारपेठेसह भारतीय शेअर बाजारावरही उमटत आहे. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या लष्करी कारवायांमुळे या प्रदेशातील परिस्थिती अत्यंत स्फोटक झाली आहे. या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण असून, त्याचा परिणाम म्हणून गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.
परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय
भारतीय कंपन्यांच्या शेअर्सवर परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा (FPI) विश्वास डळमळीत झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या आठवड्यातील केवळ 4 ट्रेडिंग सत्रांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून अंदाजे 21,000 कोटी रुपयांचे समभाग विकून आपले भांडवल काढून घेतले आहे. विशेष म्हणजे, याआधी फेब्रुवारी महिन्यात याच गुंतवणूकदारांनी 22,615 कोटी रुपयांची खरेदी केली होती, जी गेल्या 17 महिन्यांतील सर्वात मोठी खरेदी ठरली होती. मात्र, युद्धाच्या सावटाने या सकारात्मक चित्र पालटले आहे.
सलग तीन महिने विक्रीचा सपाटा
डिपॉझिटरी डेटाच्या आकडेवारीनुसार, परदेशी गुंतवणूकदार गेल्या काही महिन्यांपासून भारतीय बाजारातून सातत्याने पैसे काढत आहेत. जानेवारी महिन्यात FPI ने 35,962 कोटी रुपयांची विक्री केली होती, तर डिसेंबरमध्ये हा आकडा 22,611 कोटी रुपये इतका होता. अलीकडच्या काळात, 2 ते 6 मार्च दरम्यान झालेल्या 21,000 कोटींच्या विक्रीमुळे बाजारातील तरलतेवर परिणाम झाला आहे. पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदारांनी आता 'वाट पाहा आणि पहा' (Wait and Watch) अशी सावध भूमिका घेतल्याचे बाजार तज्ज्ञांचे मत आहे.
गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील प्रत्युत्तरात्मक हल्ल्यांमुळे जागतिक स्तरावर अनिश्चितता वाढली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी संभाव्य वाढ आणि जागतिक पुरवठा साखळीवर होणारा परिणाम यामुळे भारतीय बाजारपेठेत घबराट निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यातील या घसरणीमुळे सामान्य गुंतवणूकदारांना अल्पावधीतच लाखो-कोट्यवधी रुपयांचा फटका बसला असून, बाजार कधी सावरतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.