Strait of Hormuz: होर्मुजमध्ये इराणची अरेरावी; भारतीय तेल टँकरला धमकी देत माघारी फिरवलं, जहाजाला बदलावा लागला मार्ग

इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने होमुर्ज सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या एका भारतीय तेलवाहू जहाजाला अडविल्याची माहिती समोर आली आहे.

Strait of Hormuz: होर्मुजमध्ये इराणची अरेरावी; भारतीय तेल टँकरला धमकी देत माघारी फिरवलं, जहाजाला बदलावा लागला मार्ग

Strait of Hormuz: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला असून त्याचे पडसाद आता जागतिक सागरी वाहतुकीवरही उमटू लागले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाबाबत कठोर भूमिका घेतल्यानंतर इराणने होमुर्ज सामुद्रधुनी परिसरात आपली लष्करी उपस्थिती अधिक आक्रमक केली आहे. जगातील तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या समुद्री मार्गावर इराणकडून व्यावसायिक जहाजांवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले आहे.

भारतीय तेलवाहू जहाजाला थेट इशारा

इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने होमुर्ज सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या एका भारतीय तेलवाहू जहाजाला अडविल्याची माहिती समोर आली आहे. रेडिओ संदेशाद्वारे जहाजाच्या कॅप्टनशी संपर्क साधत नियोजित मार्ग सोडून ओमानच्या कॉरिडोरकडे परत जाण्याचा आदेश देण्यात आला. या इशाऱ्यानंतर जहाजाला आपला मूळ मार्ग बदलावा लागल्याचे वृत्त आहे.

सुरक्षित मार्गावरही वाढला तणाव

इराणच्या 'फार्स न्यूज' वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, भारतीय जहाजाला सुरक्षित मार्ग म्हणून ओमानच्या दिशेने वळविण्यात आले. काही महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षामुळे होमुर्ज सामुद्रधुनीतील वाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली होती. अडकलेल्या जहाजांना बाहेर काढण्यासाठी मागील काही आठवड्यांत हा मार्ग मर्यादित स्वरूपात खुला करण्यात आला होता. ओमान आणि संयुक्त राष्ट्रसंघ (UN) यांच्या समन्वयातून 24 जूनपासून सुरक्षित सागरी वाहतूक सुरू करण्यात आली होती, तर या मार्गाच्या सुरक्षेची जबाबदारी अमेरिकेकडे होती. मात्र, इराणच्या कारवाईमुळे या व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तेलवाहू जहाजांवर विशेष लक्ष

प्राप्त माहितीनुसार, IRGC कडून ओमान कॉरिडोर परिसरावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. विशेषतः इंधनाने भरलेली मोठी जहाजे किंवा तेलवाहू टँकर्स या मार्गावर दिसताच त्यांच्याशी रेडिओद्वारे संपर्क साधून मार्ग बदलण्याचे निर्देश दिले जात आहेत. आदेशाचे पालन न केल्यास कठोर कारवाईचा इशाराही दिला जात असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा – US Iran Conflict: इराण-अमेरिका संघर्ष विकोपाला; करार संपुष्टात आल्याची ट्रम्प यांची घोषणा, तर अमेरिकेला साथ देणाऱ्या देशांना इराणचा थेट इशारा

जागतिक व्यापारासमोर वाढलेले संकट

भारतीय जहाजासोबतच इतर देशांच्या व्यावसायिक जहाजांनाही अशाच प्रकारचे इशारे मिळत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे होमुर्ज सामुद्रधुनी परिसरातील तणाव आणखी वाढला असून जागतिक तेलपुरवठा आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिस्थितीवर विविध देश आणि आंतरराष्ट्रीय संस्था बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number