Stock Market Trend This Week: पुढील ट्रेडिंग आठवड्यात भारतीय शेअर बाजाराची चाल कशी असेल, हे प्रामुख्याने कंपन्यांचे तिमाही निकाल, मान्सूनची प्रगती आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर यांवरून ठरणार आहे. कॉर्पोरेट जगतातून 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे (Q1) निकाल जाहीर होण्यास सुरुवात होत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता आहे. विशेषतः आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनी 'टीसीएस' (TCS) 9 जुलै रोजी आपले तिमाही निकाल घोषित करणार असल्याने या घडामोडीकडे संपूर्ण बाजाराचे बारीक लक्ष असेल.
मागील आठवड्यात बाजारात तेजी पाहायला मिळाली. ज्यामध्ये सेन्सेक्स 663.44 अंकांनी (0.86 टक्के) वधारून 77,763.91 वर, तर निफ्टी 214.85 अंकांनी (0.89 टक्के) वाढून 24,270.85 च्या पातळीवर बंद झाला होता.
आयटी क्षेत्रातील निकालांवर तज्ज्ञांची नजर
रेलिगेअर ब्रोकिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित मिश्रा यांच्या मते, 9 जुलै रोजी येणारे टीसीएसचे निकाल संपूर्ण आयटी क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरतील. या निकालांसोबतच, बाजारातील मागणीचा कल, कंपन्यांचा ऐच्छिक खर्च (Discretionary Spending) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील भविष्यातील व्यावसायिक संधींविषयी कंपनी व्यवस्थापन काय भूमिका मांडते, यावर गुंतवणूकदारांची रणनीती अवलंबून असेल.
मान्सून आणि ग्रामीण अर्थव्यवस्था ठरणार महत्त्वाची
स्वास्तिका इन्व्हेस्टमार्टचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक प्रवेश गौर यांनी स्पष्ट केले की, 9 जुलैपासून सुरू होणारा कमाईचा हंगाम कंपन्यांचे मार्जिन आणि नफ्याची शाश्वती याबद्दल महत्त्वाची माहिती देईल. यासोबतच, नैऋत्य मान्सूनचा पुढील प्रवास आणि खरीप पेरणीचा वेग यावरही बाजाराची नजर असेल, कारण या घटकांवर ग्रामीण भागातील मागणी, महागाईचे नियंत्रण आणि देशाची आर्थिक वाढ अवलंबून असते.
कच्च्या तेलाचे दर आणि 'फेड'च्या धोरणांचे संकेत
आंतरराष्ट्रीय पातळीवर, 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' संदर्भातील पुरवठ्याची चिंता कमी झाल्यामुळे कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 68-69 डॉलर्सच्या आसपास स्थिर झाले आहेत. 'एनरिच मनी'चे सीईओ पोनमुडी आर. यांच्या मते, अमेरिकेतील कमजोर रोजगार आकडेवारीमुळे फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार 'फेड'च्या जूनमधील बैठकीच्या इतिवृत्ताचा सखोल अभ्यास करतील. तसेच, 11 जुलै रोजी होणाऱ्या अमेरिका आणि इराण यांच्यातील तांत्रिक चर्चेच्या पुढील फेरीकडेही बाजाराचे लक्ष असेल.
त्याचप्रमाणे, 'जिओजित इन्व्हेस्टमेंट्स'चे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनीही दुजोरा दिला की, अमेरिकेच्या फेडरल ओपन मार्केट कमिटी' (FOMC) बैठकीचे निष्कर्ष आणि देशांतर्गत मान्सूनची वाटचाल हेच आगामी दिवसांत बाजाराची अंतिम दिशा निश्चित करतील.
(Disclaimer: या बातमीमध्ये देण्यात आलेली माहिती केवळ सर्वसामान्य जागरूकतेसाठी आणि माहितीच्या उद्देशाने प्रसिद्ध करण्यात आली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी किंवा बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया आपल्या नोंदणीकृत वित्तीय सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.