Mass Shooting at South African Bar: दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरियाजवळील साउल्सव्हिल टाउनशिपमध्ये शनिवारी पहाटे झालेल्या अंधाधुंद गोळीबाराने परिसर हादरला. एका बेकायदेशीर बारमध्ये झालेल्या या हल्ल्यात 3 मुलांसह एकूण 11 जणांचा मृत्यू झाला असून 14 जण गंभीर जखमी झाले आहेत. दक्षिण आफ्रिकन पोलिस सेवा (SAPS) यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मोठ्या आवाजातील संगीताचा फायदा घेत हल्ला
दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान हा प्रकार घडला. वर्दळीच्या साउल्सव्हिल भागातील या बेकायदेशीर बारमध्ये मोठी गर्दी जमली होती. मोठ्या आवाजातील संगीताचा फायदा घेत हल्लेखोरांनी अचानक गोळीबार सुरू केला. काही मिनिटांतच बारमध्ये गोंधळ उडाला. लोक जीव वाचवण्यासाठी पळू लागले, सर्वत्र आरडाओरड सुरू झाली. गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 3 वर्षांचा मुलगा, 12 वर्षांचा मुलगा आणि एका 16 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.
तीन संशयितांचा पोलिसांकडून शोध
SAPS च्या म्हणण्यानुसार, तीन संशयित हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. त्यांची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. गोळ्या बारच्या आत मारल्या की बाहेरून, याबद्दल पोलिसांना खात्री नसली तरी हल्लेखोरांनी गर्दीला थेट लक्ष्य केले, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांनी स्थानिकांमध्ये भीती
दक्षिण आफ्रिकेत गुन्हेगारीचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले असून जगातील सर्वाधिक खून होणाऱ्या देशांमध्ये या देशाचा समावेश आहे. 2024 मध्ये 26 हजारहून अधिक लोकांना वेगवेगळ्या घटनांमध्ये संपवण्यात आले. साउल्सव्हिल परिसरात बेकायदेशीर बार, टोळीयुद्ध आणि बेकायदेशीर शस्त्रांचा वापर वारंवार होत असल्याने रहिवासी आधीच चिंतेत होते. या हल्ल्याने तर भीतीचे सावट अधिक गडद झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी स्थानिकांनी सरकार आणि पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी जलदगतीने तपास सुरू केला असून हल्लेखोरांना अटक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवली जात आहे.