Bomb Threat in Indigo Flight : गुरुवारी (4 डिसेंबर) इंडिगोच्या एका विमानात बॉम्बची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली. सौदी अरेबियातील मदिनाहून हैदराबादला (Madina-Hyderabad Flight) येत असलेल्या या विमानाला गुजरातच्या अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Sardar Vallabhbhai Patel International Airport, Ahmedabad) इमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing) करावे लागले. विमान अहमदाबादला उतरवल्यानंतर तातडीने पोलिस आणि सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आणि विमानात असलेल्या सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
सुरक्षित लँडिंग आणि तपासणी
पोलीस उपायुक्त (झोन-4) अतुल बन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सुमारे 12:30 वाजता विमानाचे सुरक्षित लँडिंग (Safe Landing) करण्यात आले. त्यानंतर विमानाची सखोल तपासणी करण्यासाठी सर्व प्रवासी आणि कर्मचारी सदस्यांनाही खाली उतरवण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मदिनाहून हैदराबादला विमान येत असताना इंडिगोला एक ईमेल (Email) आला, ज्यात विमानात बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला होता. अहमदाबाद हे सर्वात जवळचे विमानतळ असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून वैमानिकाने येथे उतरण्याचा निर्णय घेतला.
संशयित प्रवाशाचा सहभाग
बॉम्बच्या धमकीची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) त्वरित मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरुवातीच्या तपासणीत (Initial Search) काहीही संशयास्पद (Suspicious) आढळले नाही. मात्र, एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, संशयास्पद हालचाली असलेल्या एका प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलीस कारवाई सुरू आहे.
हेही वाचा – IndiGo Flights Cancellation : इंडिगोचा गोंधळ तिसऱ्या दिवशीही कायम; 200 हून अधिक उड्डाणे रद्द
इंडिगोच्या 180 हून अधिक उड्डाणे रद्द
एकीकडे बॉम्बच्या धमकीमुळे गोंधळ उडालेला असतानाच, दुसरीकडे देशांतर्गत विमान कंपनी इंडिगोने (IndiGo) याच गुरुवारी तीन प्रमुख विमानतळांवरून 180 हून अधिक उड्डाणे रद्द केली. गुरुग्राम (Gurugram) येथील ही एअरलाइन आपल्या पायलटसाठी लागू केलेल्या नवीन उड्डाण-ड्यूटी आणि विश्रांती कालावधीच्या नियमांमुळे आवश्यक असलेल्या कर्मचारी सदस्यांची व्यवस्था करण्यासाठी संघर्ष करत आहे.
एअरलाईन्सच्या ऑन-टाइम परफॉर्मन्स (OTP) कामगिरीत मोठी घसरण
दरम्यान, इंडिगोच्या मुंबई विमानतळावर रद्द झालेल्या उड्डाणांची संख्या दिवसभरात 86 वर पोहोचली. तर, बंगळुरुमध्ये 41 आगमन उड्डाणांसह 73 उड्डाणे रद्द झाली. तसेच, दिल्ली विमानतळावर 33 उड्डाणे रद्द झाली. सूत्रांनी सांगितले की, दिवस जसजसा पुढे जाईल तसतशी रद्द होणाऱ्या (Cancelled Flights) उड्डाणांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. सहा प्रमुख विमानतळांवर (दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळूरु आणि हैदराबाद) 3 डिसेंबरला एअरलाइनचा ऑन-टाईम परफॉर्मन्स (OTP) 19.7 टक्क्यांपर्यंत खाली आला, जो 2 डिसेंबरच्या 35 टक्क्यांहून निम्म्याहून कमी आहे.
हेही वाचा – SC On Voyeurism Law: संमतीशिवाय फोटो काढणे गुन्हा नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय