India New Zealand Relations: आता न्यूझीलंडमध्येही चालणार भारताचे UPI; ऑकलंडमध्ये पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

ऑकलंड येथे न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांनी आयोजित केलेल्या विशेष भोजनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.

India New Zealand Relations: आता न्यूझीलंडमध्येही चालणार भारताचे UPI; ऑकलंडमध्ये पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

India New Zealand Relations: भारत आणि न्यूझीलंडमधील द्विपक्षीय संबंधांना अधिक बळकट करण्यासाठी दोन्ही देशांनी आता डिजिटल पेमेंट क्षेत्रात एकत्र येण्याचे पाऊल उचलले आहे. ऑकलंड येथे न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांनी आयोजित केलेल्या विशेष भोजनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. भारताची लोकप्रिय डिजिटल पेमेंट प्रणाली 'UPI' न्यूझीलंडच्या जलद-पेमेंट नेटवर्कशी जोडली जाणार असून, यामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक व्यवहार अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहेत. डिजिटल तंत्रज्ञानासोबतच कृषी, शिक्षण आणि पारंपरिक वैद्यकशास्त्र या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांच्या संस्थात्मक क्षमतांचा वापर करून ठोस प्रगती साधली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कृषी, फिनटेक आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सहकार्यामुळे शेतकर्‍यांना होणार मोठा फायदा

दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीला अधिक व्यावहारिक स्वरूप दिले जात असून, फिनटेक क्षेत्रातील UPI चे एकत्रीकरण हा त्याचाच एक भाग आहे. याशिवाय कृषी, दुग्धव्यवसाय आणि अन्न प्रक्रिया या क्षेत्रांमध्ये सहकार्याचा एक भक्कम आराखडा तयार करण्यात आला आहे. या नवीन उपक्रमांमुळे भारत आणि न्यूझीलंडमधील शेतकरी तसेच पशुपालकांना थेट फायदा होणार असून, दोन्ही देशांच्या क्षमतांचा योग्य वापर करून व्यापार वृद्धीला चालना दिली जाईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

वैश्विक स्तरावर विस्तारणारे UPI नेटवर्क 

भारताची UPI पेमेंट यंत्रणा आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने आपले पाय पसरत आहे. सध्या नेपाळ, भूतान, सिंगापूर, संयुक्त अरब अमिराती (UAE), मॉरिशस, कंबोडिया आणि श्रीलंका (भारतीय पर्यटकांसाठी) या देशांमध्ये ही सेवा पूर्णपणे कार्यरत आहे. यासोबतच फ्रान्स, कतार आणि ग्रीस या देशांमधील निवडक व्यापारी दुकाने व मॉल्समध्येही UPI द्वारे व्यवहार करता येतात. आता या यादीत न्यूझीलंडचा समावेश होणार असल्याने भारताच्या डिजिटल क्रांतीला जागतिक स्तरावर आणखी मोठे यश मिळणार आहे.

शैक्षणिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला वेग 

दोन्ही देशांनी कला, संस्कृती, वारसा आणि सर्जनशील उद्योगांच्या देवाणघेवाणीला गती देण्यासाठी एका नवीन सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षऱ्या केल्या आहेत. न्यूझीलंड हे नेहमीच भारतीय विद्यार्थ्यांचे पसंतीचे केंद्र राहिले असल्याने, पंतप्रधान मोदी यांनी तेथील नामांकित विद्यापीठांना भारतात आपले कॅम्पस सुरू करण्याचे अधिकृत निमंत्रण दिले. यासोबतच आरोग्य सेवा क्षेत्रात पारंपरिक वैद्यक पद्धतींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दोन्ही देश संयुक्त प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा – Donald Trump : '1000 क्षेपणास्त्रे सज्ज'; इराणवर बॉम्बहल्ला करण्याचे आदेश दिल्याची ट्रम्प यांची चेतावनी

पंतप्रधान मोदींनी मानले आभार

दोन्ही देशांमधील संबंधांचा मुख्य कणा तेथील जनता असून भारतीय समुदायाने आपल्या कठोर परिश्रमाने व कौशल्याने न्यूझीलंडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या भारतीय नागरिकांची उत्तम काळजी घेतल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी न्यूझीलंडचे पंतप्रधान लक्सन आणि तिथल्या जनतेचे मनापासून आभार मानले. भारत आणि न्यूझीलंडच्या संयुक्त निवेदनातही या भावना अधोरेखित करण्यात आल्या असून, भारतीय समुदायाला न्यूझीलंडच्या वैविध्यपूर्ण समाजाचा अविभाज्य घटक आणि दोन्ही देशांची अर्थव्यवस्था व संस्कृती समृद्ध करणारा एक चैतन्यमय दुवा म्हणून गौरवण्यात आले आहे.  
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number