Sheshnag Drone: मध्य पूर्वेतील इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर, ड्रोन तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित होत असताना भारताने संरक्षण क्षेत्रात एक ऐतिहासिक झेप घेतली आहे. बंगळुरूस्थित 'न्यूस्पेस रिसर्च टेक्नॉलॉजीज' (NRT) या स्टार्टअप कंपनीने 'शेषनाग-150' (Sheshnag-150) नावाचा जगातील सर्वात हुशार आत्मघातकी (Kamikaze) ड्रोन विकसित केला आहे. 1000 किलोमीटर अंतरावरील शत्रूचे बंकर आणि लष्करी तळ एका क्षणात उद्ध्वस्त करण्याची क्षमता असलेला हा ड्रोन भारताचे नवे सामर्थ्य म्हणून ओळखला जात आहे.
जीपीएसशिवाय अचूक मारा आणि 5 तासांचे उड्डाण
शेषनाग-150 ची वैशिष्ट्ये पाहता, हे केवळ एक यंत्र नसून भारताचे आधुनिक 'सुदर्शन चक्र' असल्याचे बोलले जाते. हा ड्रोन सलग पाच तास हवेत उड्डाण करू शकतो आणि आपल्यासोबत 40 किलोग्रॅमपर्यंतची विनाशकारी स्फोटके वाहून नेण्यास सक्षम आहे. या ड्रोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे जीपीएस (GPS) विरहित व्हिज्युअल नेव्हिगेशन प्रणालीवर काम करते. यामुळे शत्रूला या ड्रोनचे सिग्नल जाम करणे किंवा त्याची दिशा भरकटवणे अशक्य होणार आहे.
'झुंड हल्ला' तंत्रज्ञान: शत्रूची संरक्षण यंत्रणा होणार निकामी
शेषनाग-150 ची खरी ताकद त्याच्या 'स्वार्म अटॅक' (Swarm Attack) म्हणजेच 'झुंड हल्ला' तंत्रज्ञानात आहे. यामध्ये अनेक ड्रोन एकाच वेळी शत्रूवर चालून जातात. जेव्हा हे ड्रोन एका विशिष्ट 'मदर कोड' अल्गोरिथमच्या मदतीने हल्ला करतात, तेव्हा शत्रूची महागडी हवाई संरक्षण यंत्रणा (Air Defense System) गोंधळून जाते आणि तिला हा हल्ला रोखणे अशक्य होते. कमीत कमी मानवी हस्तक्षेप आणि उच्च दर्जाची बुद्धिमत्ता यामुळे हा ड्रोन 'सायलेंट किलर' ठरत आहे.
शाहेद आणि लुकासपेक्षा सरस; भारताची मोठी झेप
इराणी 'शाहेद' आणि अमेरिकन 'लुकास' ड्रोनची जगात चर्चा असताना, भारताचा शेषनाग-150 या दोन्ही पेक्षा अनेक बाबतीत सरस ठरत आहे. अमेरिकन लुकास ड्रोन हे स्टारलिंक उपग्रहांवर अवलंबून असते, मात्र शेषनागचे व्हिज्युअल नेव्हिगेशन त्याला अधिक सुरक्षित बनवते. शाहेद ड्रोनच्या तुलनेत शेषनागची अचूकता आणि झुंड तंत्रज्ञान अत्यंत प्रगत आहे. विशेष म्हणजे, हा ड्रोन अत्यंत किफायतशीर (Cost-effective) असल्याने कमी खर्चात शत्रूच्या महागड्या मालमत्तेचे मोठे नुकसान करता येते.
हेही वाचा – Middle East Conflict Impact: सामान्यांसाठी धोक्याची घंटा? कतारच्या निर्णयानंतर भारतात वाढली आर्थिक चिंता
भविष्यातील युद्धांसाठी 'गेम चेंजर' रणनीती
पाकिस्तानने सीमेवर तैनात केलेल्या स्वस्त ड्रोन्सना उत्तर देण्यासाठी भारताने ही रणनीती आखली आहे. 'ऑपरेशन सिंदूर' सारख्या अनुभवांतून धडा घेत भारताने आता आकारापेक्षा अचूकतेवर भर दिला आहे. क्षेपणास्त्रांच्या तुलनेत हे "स्वस्त किलर्स" भविष्यातील युद्धे जिंकण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. बंगळुरूच्या प्रयोगशाळेत जन्मलेला हा 'शेषनाग' भविष्यात भारताच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि शत्रूंसाठी मृत्यूचा सापळा रचण्यासाठी सज्ज झाला आहे.