6G Technology India: पुढील पिढीच्या दूरसंचार सेवेत भारताला जागतिक महासत्ता बनवण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या हालचाली तीव्र केल्या आहेत. केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नुकताच '6G अलायन्स' (B6GA) च्या प्रगतीचा सर्वसमावेशक आढावा घेतला. या मोहिमेला गती देण्यासाठी स्पेक्ट्रम, उपकरण निर्मिती, अॅप्स आणि व्यवसाय मॉडेल्स अशा विविध घटकांसाठी 7 स्वतंत्र कार्यगट (working groups) स्थापन करण्यात आले आहेत. दक्षिण कोरिया, अमेरिका आणि चीनसारख्या प्रगत देशांशी स्पर्धा करत 2030 पर्यंत देशात 6G सेवा अधिकृतपणे सुरू करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. दूरसंचार विभागाने (DoT) आयोजित केलेल्या या उच्चस्तरीय बैठकीस दळणवळण राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी आणि दूरसंचार सचिव अमित अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
'6G अलायन्स'चे स्वरूप आणि 7 कार्यगटांची जबाबदारी
भारतातील '6G अलायन्स'ची रचना 7 विशेष गटांमध्ये करण्यात आली असून, प्रत्येक गट नेटवर्कच्या तांत्रिक व व्यावहारिक गरजांवर बारकाईने काम करत आहे. हे कार्यगट स्पेक्ट्रम (एअरवेव्हज) नियोजन, 6G रेडिओ उपकरणांचे स्थानिक उत्पादन, नवीन तंत्रज्ञानाचा शोध, अॅप्लिकेशन निर्मिती, पर्यावरणपूरक कार्यपद्धती, जन-जागृती तसेच अंमलबजावणीचा अचूक आराखडा (रोडमॅप) तयार करण्यावर भर देत आहेत. देशात 5G सेवा सुरू होऊन जवळपास 4 वर्षे पूर्ण झाली असून, ती प्रत्येक जिल्ह्यात पोहोचली आहे. त्यामुळे 5G च्या भक्कम पायावर आता 6G चे साम्राज्य उभारले जात आहे.
7,700 हून अधिक पेटंट्सची नोंद; पेटंट क्षेत्रात भारताची मोठी झेप
भारतातील संशोधन आणि नवोपक्रमाची (innovation) वाढती ताकद '6G अलायन्स'च्या कामगिरीतून स्पष्ट होत आहे. या अलायन्सशी जोडलेल्या सदस्यांनी आतापर्यंत 5G आणि 6G शी संबंधित 7,700 पेक्षा जास्त पेटंट्स दाखल केली आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंदवलेल्या 4,400 हून अधिक पेटंट्सचा समावेश आहे, ज्यामुळे जागतिक पातळीवर भारताची पकड मजबूत होत आहे. बैठकी दरम्यान 'टेलिकॉम स्टँडर्ड्स डेव्हलपमेंट सोसायटी, इंडिया' (TSDSI) ने तंत्रज्ञानाची मानके निश्चित करण्याच्या प्रगतीची माहिती सादर केली.
हेही वाचा – POK News : रस्त्यावर मृतदेहांचा सडा! पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलकांवर लष्कराचा गोळीबार; 30 जणांचा मृत्यू
पुढील 3 ते 4 वर्षांत भारताला अग्रेसर बनवण्याचे आवाहन
जागतिक स्तरावरील सर्वोत्तम कार्यपद्धतींचा (best practices) अवलंब करत सर्व यंत्रणांनी आपापसातील समन्वय वाढवावा, असे निर्देश केंद्रीय नेतृत्वाने दिले आहेत. जागतिक 6G गटांच्या प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन करून प्रणालीतील त्रुटी दूर करण्यावर भर दिला जात आहे. या धोरणात्मक नियोजनामुळे पुढील 3 ते 4 वर्षांत भारत 6G तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगाचे नेतृत्व करणारा प्रमुख देश म्हणून उदयास येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.