India Tiger Reserve Crisis NTCA Report : भारतात जगातील सुमारे 75 टक्के वाघ असल्याचा दावा केंद्र सरकार करत असले, तरी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (NTCA) अहवालाने व्याघ्रसंवर्धनातील अत्यंत गंभीर वास्तव उघड केले आहे. देशातील 58 व्याघ्रप्रकल्पांपैकी तब्बल 38 प्रकल्पांमध्ये भक्ष्य प्राण्यांची संख्या घटली असून अधिवासाचा दर्जा खालावला आहे. केवळ 20 व्याघ्रप्रकल्पांमध्ये दर्जेदार अधिवास आणि पुरेसा भक्ष्यसाठा समाधानकारक स्थितीत असून, उर्वरित 36 प्रकल्पांमध्ये तृणभक्षी प्राण्यांची कमतरता ही मुख्य समस्या बनली आहे.
नऊ व्याघ्रप्रकल्पांतील परिस्थिती अत्यंत चिंताजनक
‘रोडमॅप फॉर ॲक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ टायगर्स इन इंडिया’ या 2022 च्या गणनेवर आधारित अहवालानुसार, देशातील 9 व्याघ्रप्रकल्पांमध्ये वाघांचे अस्तित्व धोक्यात आले असून काही ठिकाणी एकही वाघ आढळलेला नाही. आता पुढील गणना 2027 मध्ये होणार आहे. 2022 च्या गणनेनुसार खालील प्रकल्पांमधील स्थिती चिंताजनक आहे:
– निवासी वाघ नसलेले प्रकल्प: मिझोराममधील दाम्पा, तेलंगणातील कावल, ओडिशातील सातकोसिया, महाराष्ट्रातील सह्याद्री आणि अरुणाचल प्रदेशातील कमलांग.
– अत्यंत कमी संख्या: झारखंडमधील पलामू आणि पश्चिम बंगालमधील बक्सा येथे केवळ 1 किंवा त्याहून कमी वाघ आढळले असून बक्सामधील वाघ भूतानमधून आला असण्याची शक्यता आहे.
– इतर प्रभावित क्षेत्रे: छत्तीसगडमधील इंद्रावती, उदंती-सीतानदी आणि गुरु घासीदास-तमोर पिंगला या प्रकल्पांमध्येही वाघ नगण्य आहेत.
संरक्षित क्षेत्राबाहेर 1,344 वाघ; शिकारीचा वाढता धोका
देशातील एकूण अंदाजे 3,682 वाघांपैकी 2,338 वाघ हे व्याघ्रप्रकल्पांत सुरक्षित आहेत, तर तब्बल 1,344 वाघ संरक्षित क्षेत्राबाहेर वावरत आहेत. त्यामुळे या वाघांवर मानवी हस्तक्षेप, अधिवास नष्ट होणे आणि शिकारीचा मोठा धोका निर्माण झाला आहे. तसेच देशातील 1,318 वाघ हे केवळ 10 प्रमुख व्याघ्रप्रकल्पांमध्ये केंद्रित असल्याने इतर अनेक भागांत समतोल बिघडल्याचे दिसून येते.
भविष्यातील गरजा आणि प्रभावी संवर्धन उपाय
मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, उत्तराखंड, बिहार, आसाम आणि सुंदरबन या भागांत व्याघ्रसंवर्धनाचे सकारात्मक परिणाम दिसले आहेत. मात्र, इतर प्रकल्पांमध्ये सुधारणा करण्यासाठी आक्रमक वनस्पती हटविणे, अधिवास सुधारणे, तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढवणे आणि संरक्षण यंत्रणा मजबूत करणे गरजेचे आहे. याशिवाय व्याघ्र मार्गिकांची (Corridors) ओळख पटवून त्यांचे संवर्धन करणे ही भविष्यातील सर्वात मोठी गरज असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.
हेही वाचा – Maharashtra Tiger Census 2026: महाराष्ट्रात वाघांची गर्जना! व्याघ्रगणनेत संख्या 600 पार; मेळघाटची मोठी झेप