Mamdani Note for Umar Khalid : दिल्ली दंगल 2020 प्रकरणातील आरोपी उमर खालिद सध्या तुरुंगात असून, त्याच्या समर्थनार्थ न्यूयॉर्कचे लोकप्रतिनिधी जोहरान ममदानी यांनी लिहिलेले हस्तलिखित पत्र वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या प्रकरणावर भारत सरकारने आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ममदानी यांना कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले. लोकशाही देशांमधील लोकप्रतिनिधींनी दुसऱ्या देशाच्या न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याचा आदर राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
काय आहे पत्राचा वाद?
डिसेंबर 2025 मध्ये उमर खालिदचे वडील सय्यद कासिम रसूल इलियास आपल्या मुलीला भेटण्यासाठी अमेरिकेला गेले होते. यादरम्यान त्यांची न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्याशी भेट झाली. या 1 तासाच्या चर्चेत खालिदने तुरुंगातून लिहिलेली पत्रे ममदानी यांनी वाचली आणि त्यानंतर स्वतःच्या हस्ताक्षरात खालिदसाठी एक सहानुभूतीपर पत्र लिहिले. या पत्रात ममदानी यांनी “प्रिय उमर, आम्ही सर्वजण तुझ्याबद्दलच विचार करत आहोत,” असे शब्द वापरून आपला पाठिंबा दर्शवला होता.
हेही वाचा – Donald Trump : व्हाईट हाऊसचा खोटारडेपणा भारताने केला उघड; एका वर्षात 8 वेळा चर्चा होऊनही म्हणे…
भारताची तीव्र प्रतिक्रिया आणि सल्ला
रणधीर जयस्वाल यांनी ममदानी यांच्या कृतीवर टीका करताना सांगितले की, सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तींनी आपल्या वैयक्तिक पूर्वग्रहांचे प्रदर्शन करणे योग्य नाही. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या सल्ल्यानुसार:
– इतर देशांतील न्यायालयीन प्रक्रियेत ढवळाढवळ करण्याऐवजी ममदानी यांनी त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करावे.
– न्यायव्यवस्थेचा सन्मान करणे हे कोणत्याही लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे.
– अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय टिप्पण्यांमुळे दोन देशांमधील राजनैतिक शिष्टाचाराचा भंग होतो.
Zohran Mamdani writes to Umar Khalid.
December 2025. #FreeUmarKhalid#FreeAllPoliticalPrisoners pic.twitter.com/QTYe06cRp5 — banojyotsna … (@banojyotsna) January 1, 2026
सोशल मीडियावरील चर्चा आणि वडिलांचा खुलासा
उमर खालिदची मैत्रीण बनोज्योत्स्ना लाहिरी यांनी हे हस्तलिखित पत्र ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले होते, ज्यानंतर भारतातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. दरम्यान, ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना खालिदच्या वडिलांनी स्पष्ट केले की, ममदानी यांचे या संपूर्ण खटल्याकडे बारीक लक्ष आहे. खालिदच्या विचारांनी प्रभावित होऊनच त्यांनी हे पत्र लिहिल्याचा दावा इलियास यांनी केला आहे.