Pravin Tarde: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे 4 वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि मृत्यूच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या अमानवी कृत्यावर मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. “अशा नराधमांना अद्दल घडवण्यासाठी मी लवकरच सिनेमा काढेन, जो पाहून पुन्हा कोणी असं कृत्य करण्याची हिंमत करणार नाही,” असा निर्धार तरडे यांनी बोलून दाखवला.
स्वामी समर्थांच्या दरबारातून दिला इशारा
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले असता, तरडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “मी एक फिल्म मेकर असलो तरी शेवटी एक माणूस आहे. महाराष्ट्रातील मुलींच्या बापांना विचारा, नसरापूरची बातमी ऐकल्यावर त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल? या विषयावर मी आधी दिलेली प्रतिक्रिया पाहून गदारोळ झाला होता, पण मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे.”
‘देऊळ बंद’मध्ये नराधमांचा अंत?
प्रवीण तरडे यांनी यावेळी आपल्या आगामी प्रकल्पांविषयी मोठी घोषणा केली. आगामी काळात ‘देऊळ बंद’ या गाजलेल्या सिनेमाचे 11 भाग करण्याची त्यांची योजना आहे. “कायद्याच्या चौकटीपलीकडे जाऊन स्वामी समर्थ जेव्हा स्वतः शिक्षा द्यायला उतरतात, तेव्हा ती अत्यंत भयानक असते. ‘देऊळ बंद’च्या पुढील भागात अशा नराधमांना ठेचण्यासाठी स्वतः स्वामी येतील, असे मी दाखवणार आहे,” असंही त्यांनी यावेळी सांगितलं. त्यांनी पुढे म्हटलं की, गुन्हेगाराला असा मृत्यू पडद्यावर दिसेल की, तो पाहून गुन्हेगारांच्या मनात धडकी भरेल आणि पालकांच्या मनात आशेचा किरण निर्माण होईल.
‘मुळशी पॅटर्न’चा दिला दाखला
आपल्या कामाचा समाजावर होणारा परिणाम स्पष्ट करताना ते म्हणाले, “‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटानंतर शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचे प्रकार कमी झाले, कारण त्या चित्रपटाने शेतकऱ्यांना जागे केले. आता वेळ आली आहे अशा नराधमांना धडा शिकवण्याची. मी माझ्या चित्रपटाच्या माध्यमातून या विषयाला वाचा फोडणारच.” सध्या जे समाजात घडत आहे ते अतिशय भयावह असून, चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन न राहता गुन्हेगारांवर वचक बसवणारे माध्यम ठरावे, असा तरडे यांचा प्रयत्न असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.