Indonesia Ferry Fire : इंडोनेशियातील सागरी हद्दीत एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात समोर आला आहे. प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका मोठ्या फेरीला (प्रवासी जहाजाला) अचानक भीषण आग लागली. या दुर्घटनेत आतापर्यंत 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 41 प्रवासी अद्याप बेपत्ता आहेत. 'नॅशनल सर्च अँड रेस्क्यू एजन्सी'ने दिलेल्या माहितीनुसार, या जहाजावर एकूण 271 नागरिक प्रवास करत होते.
पूर्व जावा प्रांतातील सुराबाया या दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या शहरातून हे जहाज दक्षिण सुलावेसीतील मकासार शहराकडे जात असताना हा अपघात घडला. प्रवासादरम्यान अचानक जहाजातून आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट निघू लागले, ज्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. जहाजाच्या कॅप्टनने प्रसंगावधान राखून तात्काळ या आगीची माहिती आपत्कालीन यंत्रणांना दिली.
मादुरा बेटाजवळ रेस्क्यू ऑपरेशन; अनेकांना वाचवण्यात यश
मिळालेल्या माहितीनुसार, जावाच्या ईशान्य किनारपट्टीजवळ असलेल्या मादुरा बेटाजवळ 'मुतियारा संतोसा 2' या जहाजाला आगीने वेढले होते. घटनेची माहिती मिळताच तटरक्षक दलाची जहाजे, अनेक बचाव नौका आणि वैद्यकीय पथके तातडीने घटनास्थळी रवाना झाली. समुद्रात बुडणाऱ्या आणि आगीच्या तावडीत सापडलेल्या अनेक प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
तथापि, समुद्रातील प्रतिकूल परिस्थिती आणि आगीची तीव्रता यामुळे बेपत्ता असलेल्या 41 जणांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान बचाव पथकांसमोर आहे. या सर्व प्रवाशांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम अविरतपणे सुरू ठेवण्यात आली आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचे स्पष्ट कारण अद्याप समोर आलेले नाही. इंजिनमधील तांत्रिक बिघाड, शॉट सर्किट किंवा इतर काही कारणांमुळे ही दुर्घटना घडली का, याचा सखोल तपास करण्यासाठी प्रशासन एका विशेष चौकशी पथकाची नियुक्ती करणार आहे.
हेही वाचा – Plane Crash : मोठी बातमी! पर्यटकांना घेऊन जाणारे विमान कोसळले; विमानातील सर्व 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू
इंडोनेशियात सागरी वाहतुकीदरम्यान अशा दुर्घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी जुलै महिन्यातही 300 हून अधिक प्रवासी असलेल्या एका जहाजाला अशीच भीषण आग लागली होती, ज्यामध्ये जहाजाचे मोठे नुकसान झाले होते. वारंवार घडणाऱ्या अशा दुर्घटनांमुळे आता इंडोनेशियातील सागरी वाहतूक आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.