Hapur Acid Incident: उत्तर प्रदेशातील हापूर येथे निष्काळजीपणाचा एक अंगावर काटा आणणारा प्रकार समोर आला आहे. अर्जुन नगर भागात राहणारी रिया नावाची तरुणी शुक्रवारी संध्याकाळी सराफा बाजारात दागिने खरेदी करण्यासाठी गेली होती. दुकानात असताना तीव्र तहान लागल्याने तिने पाणी मागितले. दुकानदाराने शेजारील मिठाईच्या दुकानातून पाण्याच्या ब्रँडेड कंपनीची थंड बाटली मागवून तिला दिली. मात्र, या बाटलीत पाण्याऐवजी जळजळीत ॲसिड भरलेले होते.
बाटली उघडून रियाने जसा एक घोट घेतला, तशी तिच्या तोंडात आणि घशात तीव्र जळजळ झाली. वेदनेने विव्हळत तिने तात्काळ ते द्रव बाहेर थुंकले आणि ती दुकानाच्या बाहेर पळाली. तिची प्रकृती झपाट्याने खालावल्याने तिला तातडीने स्थानिक रुग्णालयात आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी मोठ्या वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले असून, सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
Teacher Riya drank acid from a sealed Bisleri bottle (mistaken for water) while jewelry shopping in Meerut. She’s fighting for life in hospital. Shopkeeper in custody; claims it was company-supplied. Shocking CCTV shows the moment.
pic.twitter.com/ucpPTqcUlM — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 11, 2026
सीसीटीव्ही फुटेज आले समोर;
हा सर्व धक्कादायक प्रकार दागिन्यांच्या दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत दुकानदाराला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशी दरम्यान दुकानदाराने दावा केला आहे की, ती बाटली पूर्णपणे सीलबंद (Sealed) होती आणि ती थेट डीप फ्रीझरमधून काढून देण्यात आली होती.
पोलिसांनी संबंधित दुकानावर छापा टाकून तपास केला असता, तेथून अशा प्रकारच्या ॲसिडने भरलेल्या आणखी काही संशयास्पद बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. पाण्याच्या सीलबंद बाटलीत ॲसिड कसे आले आणि या भयंकर निष्काळजीपणाला नेमके कोण जबाबदार आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक (Forensic) तपासणी सुरू केली असून वैद्यकीय अहवालानंतर पुढील कायदेशीर पावले उचलली जाणार आहेत.